Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / मदतीचा हात हवा

मदतीचा हात हवा

कोरोना विषाणूच्या फैलावाची कधीही न अनुभवलेली अशी दहशत, दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झालेले आणि त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने डोक्यावरील छप्परही उद्ध्वस्त केले अशा भीषण अवस्थेत आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य आहेत. या सार्‍यांसोबतच रायगड जिल्ह्याला आर्थिक मदतीची गरज असून महाराष्ट्रच नव्हे तर देशही त्यांच्या पाठिशी उभा राहील अशी अपेक्षा आहे.

निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक धडकणार हे अपेक्षितच होते. परंतु प्रचंड तीव्रतेचे हे चक्रीवादळ जाता-जाता जिल्ह्याचे किती पराकोटीचे नुकसान करून जाईल याचा अंदाज मात्र कुणालाच नव्हता. एकीकडे या चक्रीवादळामुळे मोठी जीवितहानी झाली नाही याचा दिलासा असला तरी झाडे, बागा, घरे, होड्या यांचे प्रचंड नुकसान या चक्रीवादळाने केले आहे. रायगड जिल्ह्यातील अनेकांना या चक्रीवादळाने अशातर्‍हेने अन्नपाण्याविना उघड्यावर आणून सोडले आहे की आपला अर्धामुर्धा उरलेला संसार आवरताना त्यांना कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मास्क लावण्याचे वा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच भान कुठून राहणार? अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडकले होते. वादळाच्या ज्या प्रकारच्या तीव्रतेचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते त्या तुलनेत मुंबई व ठाण्यात वादळाचा प्रभाव खूपच कमी जाणवला. त्यामुळे तिथे सुरक्षित बसून कदाचित रायगड जिल्ह्यातील परिस्थितीचा अंदाज येणार नाही. जिल्ह्यातील विशेषत: अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांना वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. पोलादपूर, माणगाव, रोहा, तळा, पेण आणि उरण तालुक्यातही वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी शासकीय यंत्रणेने आदल्या दिवशी अनेकांना नजीकच्या सुरक्षित स्थळी नेले खरे. पण वादळ निघून गेल्यावर दुसर्‍या दिवशी आपले सारे होत्याचे नव्हते झालेले पाहून धक्का बसलेल्या यापैकी अनेकांना साधे अन्नपाणी देण्याचाही विसर यंत्रणेला पडलेला दिसला. यापैकी अनेकांच्या आसवांचे बांध मग फुटले. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे ठिकठिकाणी वीजेचे खांब व तारा कोसळल्याने निम्म्याहून अधिक रायगड जिल्हा बुधवारी अंधारात होता. पेण मंडळाअंतर्गत अनेक भागांत वीजपुरवठा यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गुरुवारीही वीज नव्हती. शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांनाही चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली असून बागायतींची अपरिमित हानी झाली आहे. श्रीवर्धन येथे फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे उद्ध्वस्त संसार उभारण्यासाठी हात देतानाच, जुनी आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांनाही सरकारने मदतीचा हात द्यायला हवा आहे. वादळग्रस्त कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे व त्यासोबत नेहमीच्या अटी लावू नयेत अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या परिसरात राज्यमार्गावरही अनेक झाडे पडली होती. ती दूर करून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. गावांमधील रस्त्यांवर पडलेली झाडे स्थानिकांकडूनच हटवण्यात आली आहेत. तळा तालुक्यात एका गर्भवतीला रुग्णालयात जाण्यात अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती कुणावरही ओढवू नये यादृष्टीने रस्ते आधी मोकळे करण्याची गरज आहे.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp