Tuesday , August 11 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / गरज जीवनदात्यांची

गरज जीवनदात्यांची

जगभरात कोरोना महामारीचा फैलाव झाल्यापासूनच प्लाझ्मा थेरपी या साथीवरील उपचारात उपयुक्त ठरु शकेल का या दिशेने विचार सुरु होता. या उपचारपध्दतीचा कोरोनासदृश्य आजारांच्या बाबतीत उपयोग झालेला असल्याने तशी ही उपचारपद्धती नवीन नाही. परंतु कोविड 19च्या संदर्भात ही प्रभावी ठरते आहे असे म्हणण्यासाठी तिच्या पुरेशा व्यापक वैद्यकीय चाचण्या होण्याची गरज आहे. या चाचण्यांकरीता कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. असे दाते मिळवणे हेच यातले मोठे आव्हान ठरताना दिसत आहे.

जगभरात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत गेला तेव्हा या विषाणूबद्दल फारशी माहिती नव्हती, त्यावर औषध नाही की लस नाही. यामुळे सारेच वैद्यकीय विश्व काहीसे हबकले होते. परंतु त्याच सुमारास प्लाझ्मा थेरपीच्या रुपाने एक अंधुकसा आशेचा किरण समोर आला. आज कोरोना जगभरात पसरुन जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ लोटलेला असताना थेट अमेरिकेपासून भारतापर्यंत सगळीकडेच प्लाझ्माच्या जमवाजमवीसाठी सरकारी पातळीवर जोर लावला जात आहे. अमेरिकेतील फेडरल आरोग्य अधिकार्‍यांनी देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रक्तातील प्लाझ्माचा साठा वाढवण्यासाठी देशातील रेडक्रॉस आणि अन्य रक्तसंकलन करणार्‍या संघटनांना जोरदार प्रयत्न करण्यास नुकतेच सांगितले आहे. तर आपल्याकडे देशातील पहिली प्लाझ्मा बँक राजधानी दिल्लीत गुरुवारपासून सुरु झाली. जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात सुरु केल्याचा दावा जूनअखेरी केला गेला आहेच. राज्यात वैद्यकीय महाविद्यालये व पालिका रुग्णालये अशा एकूण तेवीस ठिकाणी प्लाझ्मा थेरपी वापरण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी सतरा ठिकाणी या थेरपीचा वापर कोविड रुग्णांसाठी केला जात आहे. ‘प्रोजेक्ट प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी’ नामक या उपक्रमात प्रकृती गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांना ही थेरपी मोफत उपलब्ध आहे. ुुु.श्रिरीारूेववहर.ळप या संकेतस्थळावर प्लाझ्मा देऊ इच्छिणार्‍या दात्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले असले तरी अद्याप या आवाहनास म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही. दाते मिळवणे कठीण जात असल्याचा अनुभव दिल्ली, पंजाब आदी राज्यांतही समोर आला आहे. मुळातच आपल्याकडे कोरोनाविषायी असलेली पराकोटीची भीती हे त्यामागील प्रमुख कारण असावे. काही प्रमाणात आपल्याकडे कोरोनातून बरे होऊन परतणार्‍यांचे वाजतगाजत स्वागत झाले असले तरी अशिक्षित वा अल्पशिक्षित समुदायांमध्ये संबंधित रुग्ण व त्याच्या कुटंबियांना वाईट वागणूक मिळाल्याचेही दिसून आले. त्यामुळे एकदा कोरोनातून बरे होऊन घरी परतल्यानंतर पुन्हा हॉस्पिटलकडे परतण्याचा विचार करण्यास कुणी सहजपणे धजावत नाही. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची भीती देखील या रुग्णांच्या मनात असते. या सार्‍याच्या उपर सगळेच बरे झालेले कोरोना रुग्ण प्लाझ्मा दाते होऊ शकत नाहीत हेही एक कारण आहेच. अठरा ते साठ या वयोगटातील डायबेटिस, ब्लडप्रेशर व अन्य आजार नसणारे कोरोनातून बरे झालेले रुग्णच प्लाझ्मा दान करु शकतात. प्लाझ्मा हा आपल्या रक्तातील एक घटक असून दान केल्यानंतर तो शरीरात सहजपणे पुन्हा तयार होऊ शकतो याची अनेकांना कल्पना नसते. आपल्या कुटुंबियांना पुढे गरज भासल्यास त्यांना आपण प्लाझ्मा दान करु असा विचारही काही रुग्ण करत असावेत. परंतु रूग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर दहा दिवसांनी व अठ्ठावीस दिवसांच्या आतच या प्लाझ्मासाठीचे रक्तदान करता येते. जितका या दानाला विलंब केला जाईल तितका प्लाझ्मा थेरपीचा प्रभावही कमी होऊ शकतो. कोरोना विषाणूंच्या संसर्गातून बर्‍या झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मामध्ये ‘कोरोनाशी लढलेल्या अ‍ॅन्टीबॉडीज’ असतात. या अ‍ॅन्टीबॉडीजमुळेच हे बरे झालेले रुग्ण इतर तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी जीवनदाते ठरु शकतात.

Check Also

मुरूडमध्ये रंगला आगळावेगळा रानभाजी महोत्सव

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या विद्यमाने कृषी …

Leave a Reply

Whatsapp