Friday , September 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / शेकाप नेते जयंत पाटील खोटारडे राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय मसूरकरांचा पलटवार

शेकाप नेते जयंत पाटील खोटारडे राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय मसूरकरांचा पलटवार

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक (केटीएसपी) मंडळावर रायगड जिल्हा मध्यवर्ती (आरडीसी) बँकेचे फक्त पाच कोटींचे कर्ज असून, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबत खोटी आकडेवारी सांगून दिशाभूल केली असल्याचा पलटवार खोपोली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांनी रविवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत केला.

दोन दिवसांपूर्वी कर्जत येथील राष्ट्रवादी-शेकाप कार्यकर्ता मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दत्तात्रेय मसूरकर यांच्यावर व्यक्तिगत हल्ला चढवून जोरदार टीका केली, तसेच खोपोली राष्ट्रवादी म्हणजे मसूरकर पार्टी असल्याचा आरोप केला होता. मसूरकरांनी केटीएसपी मंडळ खड्ड्यात घातले, परंतु संस्था अडचणीत आली तेव्हा आपण आरडीसी बँकेच्या माध्यमातून केटीएसपी मंडळाला 12 कोटींच्या वर कर्ज दिले. म्हणून आज संस्था सुरू असल्याचा दावा पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत केला. विशेष बाब म्हणजे या सभेत मसूरकर उपस्थित नव्हते. आमदार जयंत पाटील यांच्या या आरोपांची दखल घेत रविवारी दत्तात्रेय मसूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या वेळी माहिती देताना मसूरकर यांनी सांगितले की, आरडीसी बँकेचे केटीएसपी मंडळावर डिसेंबर 2010 साली घेतलेले तीन कोटी 70 लाख व फेब्रुवारी 2014मध्ये घेतलेले 2 कोटी असे एकंदरीत 5 कोटी 70 लाख एवढे कर्ज होते. या संदर्भात बँकेने संस्था व संचालक मंडळाची मालमत्ता लीज केलेली आहे हे विशेष. एकूण कर्जापैकी जून 2017पर्यंत संस्थेने बँकेचे 2 कोटी आरडीसी फेडले असून, बँकेकडून आकारण्यात येत असलेल्या 13 टक्के व्याजाप्रमाणे संस्थेने आतापर्यंत 3 कोटी 5 लाख एवढी रक्कम व्याजापोटी आरडीसी बँकेत भरली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांनी केलेला संस्थेवर 13 ते 14 कोटींच्या कर्जाचा दावा खोटा असून, ही संस्थेची एकप्रकारे बदनामी व संस्थेवर प्रेम करणार्‍या शिक्षक, पालक, विद्यार्थी व सभासदांची दिशाभूल करून गैरसमज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, अशी टीका मसूरकर यांनी केली.

Check Also

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. …

Leave a Reply

Whatsapp