Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / जपा डोळ्यांचे आरोग्य

जपा डोळ्यांचे आरोग्य

आरोग्य प्रहर

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गात डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे होऊन डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो. डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, नजर कमी होणे आदी त्रासदायक लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. संगणकाच्या अतिवापराने अश्रुपटल कोरडे होण्यासोबतच एका विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित केल्याने डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात. संगणकाच्या वापरामुळे डोळ्यांना होणार्‍या या त्रासाला कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम म्हणतात.

दिवसांतून दोन-तीन तासांहून अधिक काळ संगणकासमोर बसून काम करणार्‍या व्यक्तींनी दर 20-30 मिनिटांनंतर चार-पाच मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी. हे शक्य नसल्यास कार्यालयाच्या खिडकीमधून लांबवर पाहावे. या काळात मोबाइल किंवा अन्य गॅझेटस पाहू नयेत. काम करताना जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करावी. वातानुकूलित वातावरण असल्यास एसीचा झोत थेट चेहर्‍यावर येणार नाही याची काळजी घ्यावी. या दैनंदिन सवयी बदलल्या तरी डोळ्यांचे आजार बर्‍यापैकी कमी होण्यास मदत होते. या बाबी अमलात आणूनही डोळ्यांना त्रास जाणवत असल्यास मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळे सातत्याने कोरडे पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉपचा वापर करण्यास हरकत नाही.

मोबाइल किंवा संगणकाची स्क्रीन व डोळे यामध्ये अंतर ठेवावे. हे अंतर काही वेळाने बदलत राहावे, जेणेकरून डोळ्यांवर कमी ताण येतो. मोबाइल किंवा संगणकाच्या स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांना त्रासदायक ठरणार नाही इतका कमी ठेवावा.

मोबइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यांत कोरडेपणा येणे, डोळे दुखणे, आग होणे ही लक्षणे दिसतात. मोबाइलचा अतिवापर लहान मुलांसाठी धोकादायकदेखील ठरू शकतो हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp