Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / दूध दरवाढीसाठी भाजपचा एल्गार

दूध दरवाढीसाठी भाजपचा एल्गार

राज्यव्यापी आंदोलनाला सहकारी पक्षांचीही साथ

कोल्हापूर : प्रतिनिधी
दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून शनिवारी (दि. 1) राज्यव्यापी दूध बंद केले. या आंदोलनाचे राज्यात पडसाद उमटले. ठिकठिकाणी रास्ता रोको केला गेला, तर महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक घालून निषेध करण्यात आला.
दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकर्‍यांचा आवाज भाजपप्रणित महायुतीने बुलंद करीत राज्यातील विविध भागात शनिवारी पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात केली. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. गावागावांमध्ये ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक करण्यात आला. काही ठिकाणी गरजूंना दूध वाटप केले गेले. गाईच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्या. दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे तसेच दुधाला प्रति लिटर 30 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली.
महायुतीच्या दूध आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यामध्ये रात्री पडली. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा आणि तासगाव या ठिकाणी दूध वाहतूक रोखली, तर दूध दरावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कराड-सोलापूर मार्गावर दिघंची गावाजवळ जर्सी गाय रस्त्यावर उभी करीत आंदोलन केले. तासगाव-कराड रस्त्यावर रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे कॅन वाहतूक करणारी गाडी रोखून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मावळ येथील पुणे जिल्हा सहकारी दूध संघासमोर झालेल्या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. या वेळी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने शेतकर्‍यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. दूध उत्पादक शेतकर्‍यांना या काळात मोठा फटका बसला. अजूनही दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. गायीच्या दुधाला 30 रुपये दर मिळाला पाहिजे, परंतु सध्या शेतकर्‍यांना लिटरमागे 20 रुपयेसुद्धा मिळत नाहीये. सरकारने यासाठी प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यायला हवे. दुधाच्या भूकटीचा विषय केंद्र सरकारचा असेल तर राज्य सरकारने तसे प्रपोजल बनवून पाठवावे. केंद्र सरकार सहकार्य करेल, परंतु आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी किती वेळा दिल्लीला गेलेत? त्यांना जर शेतीतील काही कळत नसेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, बाळासाहेब थोरात हे शेतीतील जाणकार आहेत. त्यांना केंद्राकडे शेतकर्‍यांच्या समस्या घेऊन पाठवा, असे पाटील म्हणाले.
नागपूरजवळील कामठी येथील अजनी गावात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गरिबांना दूध वाटप करून भाजपने आंदोलन केले. या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बीड जिल्हा भाजपच्या वतीने दूध दरवाढीच्या समर्थनात जिल्हाधिकारी कचेरीसमोर अनोख आंदोलन केले गेले. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नंदीबैलाला प्रश्न विचारले. त्यानंतर राज्य सरकारचा निषेध म्हणून कुत्र्याला दूध पाजून या आंदोलनाची सांगता करण्यात आली.
राजू शेट्टी सकारी आंदोलक : देवेंद्र फडणवीस
दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून पुकारण्यात आलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करीत आहेत, मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही, असे फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. या वेळी फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला लगावला.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp