Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / तुटपुंज्या मदतीने बागायतदार नाराज

तुटपुंज्या मदतीने बागायतदार नाराज

योग्य भाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा

मुरूड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी व इतर बागायती उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे, जे पुढील 10 ते 12 वर्षे भरून निघू शकत नाही. असे असताना राज्य सरकारने सुपारीसाठी 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपये नुकसानभरपाई मंजूर करून बागायतदारांची थट्टा केली आहे. दिलेला भाव आम्हाला मंजूर नसून शासनाने पुनर्विचार करून भाव वाढवून द्यावा; अन्यथा जनतेच्या भावनेचा उद्रेक होऊन जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा मुरूड तालुका संघर्ष समितीमार्फत राज्य सरकारला देण्यात आला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कृषिमंत्री दादा भुसे, स्थानिक आमदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, एका सुपारीच्या झाडापासून वार्षिक किमान एक हजार रुपये, नारळापासून दोन हजार रुपये, आंब्याच्या झाडापासून 10 हजार रुपये, फणस-चिकू-पेरूपासून 1200 ते 1500 रुपये, तर केळीपासून 500 रुपये उत्पन्न मिळते, मात्र वादळात ही पिकेच उद्ध्वस्त झाल्याने बागायतदार शेतकर्‍यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन नष्ट झाले आहे. उन्मळून पडलेली झाडे नव्याने लागवड केल्यानंतर 10 ते 12 वर्षे वाट पहावी लागणार आहे. शासनाने योग्य ते पंचनामे केलेले नाहीत. केले असल्यास कोणत्या निकषावर कृषितज्ज्ञांनी केली याची कल्पना आम्हास मिळावी.
बागायती पूर्ववत होण्यासाठी आठ ते 12 वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे तसेच पुन्हा लागवडीसाठीही मोठा खर्च येणार आहे. या सर्वांचा विचार करून शासनाने कृषितज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन झालेल्या नुकसानभरपाईचा पुर्नविचार करावा आणि कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुरूड तालुका संघर्ष समितीने केली असून, शेकडो सह्यांचे निवेदन थेट मुख्यमंत्र्यांना रवाना केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विरकुड यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळामुळे सुपारी व नारळाची झाडे पूर्णतः पडली आहेत. कोकणावर असे महाभयंकर संकट प्रथमच आले असून, सुपारी व नारळाचे बागायतदार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकार चांगला भाव देईल, अशी आम्हाला आक्षा होती, परंतु दिलेला भाव फार कमी आहे. तरीसुद्धा सरकारने पुन्हा विचार करावा; अन्यथा जनभावनांचा उद्रेक होऊन लोक रस्त्यावर आपल्या न्याय्य-हक्कासाठी उतरतील व मोठे आंदोलन छेडले जाईल. ते लक्षात घेऊन भाव वाढवून द्यावा.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp