Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / रेशनच्या तांदळाचा काळा बाजार

रेशनच्या तांदळाचा काळा बाजार

अवैधरित्या साठा केलेले धान्य जप्त; तिघांना अटक

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार
पनवेल शहर पोलिसांनी पळस्पे येथील एका रेशन गोडाऊनमध्ये अवैधरित्या साठा करून ठेवलेला 110 टन शासकीय रेशन तांदूळ जप्त केला आहे. या तांदळाची किंमत 33 लाख आठ हजार रुपये असून, या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोविड-19 या साथीच्या आजारामध्ये गोरगरिबांना वाटण्यासाठी देण्यात आलेल्या रेशन धान्याचे गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील गोडाऊनमध्ये रेशनिंगच्या धान्याचा अवैधरित्या साठा केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी निलेश राजपूत, दीपक कादबाने, कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी संतोष पाटील, अर्चना घरत, तेजराव तवर व कर्मचारी यांनी शनिवारी (दि. 31) टेक केअर लॉजिस्टिकच्या पळस्पे येथील पलक रेशन गोडाऊन येथे जाऊन छापा टाकला. तेथे त्यांना चार कंटेनरमध्ये रेशनिंग तांदळाच्या प्रत्येकी 50 किलो वजनाच्या दोन हजार 220 गोणी आढळल्या. पोलिसांनी हा माल व दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले आहेत. (पान 2 वर..)
या प्रकरणी पोलिसांनी भीमाशंकर रंगनाथ खाडे, इक्बाल काझी (गाळ्याचा मालक), लक्ष्मणचंद्र पटेल या तिघांना अटक केली आहे. यातील आरोपी भीमाशंकर रंगनाथ खाडे याच्यावर मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यानेच बारशीहुन हा तांदूळ पनवेल येथे आणला होता. या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. हा तांदूळ येथे कशासाठी आणला, बार्शीहून कसा आला व कुठे विकला जाणार होता आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp