Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / सुशांतची आत्महत्या अन् गुंतागुंत

सुशांतची आत्महत्या अन् गुंतागुंत

वैश्विक महामारी कोरोनानंतर देशात सर्वांत जास्त चर्चा कशाची होत असेल तर ती म्हणजे बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची. या घटनेमागचे कारण समोर येण्याऐवजी दिवसेंदिवस यामध्ये नवनवे खुलासे होत आहेत. त्याचवेळी काही जण आपल्या अकलेचे तारे तोडत असल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे.

युवा, उमदा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची बातमी जून महिन्याच्या 14 तारखेला आली आणि अवघी सिनेसृष्टी हळहळली. एकामागोमाग एक हिट सिनेमे देणार्‍या सुशांतने वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी घेतलेली एक्झिट अनाकलनीय आहे. पैसा व प्रसिद्धी अल्पावधीतच मिळविणार्‍या सुशांतने खरंच आत्महत्या केली असेल का, असा प्रश्न पहिल्या दिवसापासून विचारला जात होता. तो आजही कायम आहे. अशी कोणती चिंता त्याला होती ज्यामुळे त्याने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले याचे गूढ अद्याप पोलिसांकडून उकलले गेलेले नाही. मध्यंतरी असेच चक्रावून टाकणारे शीना बोरा हत्याकांड उजेडात आले होते. अर्थात, ही दोन वेगवेगळी प्रकरणे आहेत. शिवाय शिनाची हत्या झाली होती, तर सुशांतने आत्महत्या केली असल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो. सुशांतच्या केसमध्ये अनेकांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव म्हणजे सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती. बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्ती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या आधारे पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत तपासाच्या अनुषंगाने आले असता, महापालिकेने त्यांना क्वारंटाइन केले होते. त्यामुळे बिहार पोलीस विरुद्ध मुंबई महापालिका असे वॉर रंगले. हे वादळ शमते न शमते तोच सीबीआयने या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मनी लॉण्ड्रिगप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे पोलीस, न्यायालय, सीबीआय, ईडी असे चौकशीचे फेरे सुरू झाले आहेत. यात अनेकांचे जबाब नोंदविले जात आहेत. सुशांतची संशयास्पद आत्महत्या आणि एवढे दिवस उलटूनही चित्र स्पष्ट होत नसल्याने बॉलीवूडसह विविध स्तरांतील लोक आपापली मते व्यक्त करीत आहेत. अशातच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून बदनामी केल्याने राजपूत कुटुंबीय संतप्त झाले आहेत. सुशांत याचा चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार नीरज सिंह बबलू यांनी या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. राऊत यांनी ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून सुशांतचे वडील के. के. सिंह यांची दोन लग्ने झाल्याने सुशांत नाराज होता. त्यामुळे तो त्यांना भेटायलाही जात नव्हता, असा दावा केला होता. त्यावर नीरज सिंह बबलू यांनी ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे तसेच सुशांत वडिलांवर नाराज होता हे राऊत यांना कुणी सांगितले, असा सवाल करतानाच या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. या हायप्रोफाइल मर्डर मिस्ट्रीप्रकरणी विविध यंत्रणा तपास करीत आहेत. तेव्हा अशा वेळी पुराव्याअभावी उगाचच काही तरी बरळण्याऐवजी शांत बसणे आवश्यक आहे, मात्र काही जण सनसनाटीच्या नावाखाली आणि चर्चेत राहण्याकरिता आक्षेपार्ह विधाने करीत असतील तर ते चुकीचे आहे.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp