Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / कोसळलेल्या झाडांचे पुनर्रोपण

कोसळलेल्या झाडांचे पुनर्रोपण

पनवेल ः बातमीदार

मागील तीन-चार दिवस झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणच्या निसर्गसंपदेचे नुकसान झाले आहे. नेरूळ आणि बेलापूरच्या सीमेवर असलेल्या निसर्गसंपन्न पारसिक हिल टेकडीलाही याचा फटका बसला आहे. येथील मोठमोठे वृक्ष मुळासह उन्मळून पडले आहेत. त्या अनुषंगाने झाडांचे संगोपन करणार्‍या रहिवाशांनी ही निसर्गसंपदा वाचविण्यासाठी पुढाकार घेतला असून, उन्मळून पडलेल्या झाडांचे त्याच ठिकाणी त्यांनी पुनर्रोपण केले आहे.

वादळी वारा-पावसात पारसिक हिल टेकडीवरील सरासरी 25 ते 30 मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. ही झाडे 10 ते 15 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहेत. झाडांची लागवड येथील पारसिक हिल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. त्यांचे संगोपनही त्यांच्या वतीनेच केले जात होते. त्यांना सकाळ-संध्याकाळी पाणी घालण्याचे कामही असोसिएशनचे सदस्य करतात. त्यामुळे या झाडांबरोबर त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. त्यांना कोसळलेले पाहून सर्वांनाच दुःख झाले. म्हणूनच या झाडांचे पुनर्रोपण करण्याची कल्पना काहींच्या मनात आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरविली.

झाडे उन्मळून पडल्याने या टेकडीची हिरवळ कमी झाली. या झाडांच्या जागी दुसरी झाडे लावली तर ती मोठी व्हायला आणखी 10-12 वर्षे जातील. त्यापेक्षा याच झाडांचे पुनर्रोपण करून त्यांची काळजी घ्यायचा निर्धार त्यांनी केला. झाडे मोठी असल्याने ती हाताने उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे क्रेन मागवून त्याच्या साह्याने झाडे उचलून योग्य ठिकाणी त्यांचे अगदी व्यवस्थित रोपण करण्यात आले. झाडे पडून नयेत यासाठी झाडांना एकमेकांशी दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. या झाडांची काळजी घेण्याची शपथ येथील रहिवाशांनी घेतली आहे. वादळामुळे झाडांची पडझड झाली होती. ती पडझड नीट कापून पुन्हा क्रेनद्वारे

पुनर्रोपण करण्यात आले. खूप वर्षांपासून लावलेली झाडे पडल्यामुळे पारसिक हिलवर राहणार्‍या आम्हा सर्वांना अतिशय वाईट वाटले, परंतु पारसिक हिल असोसिएशनतर्फे या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. मोठी झाडे क्रेनद्वारे सरळ करून दोरी बांधून ठेवण्यात आली आहेत, असे रहिवासी जयंत ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp