Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / नवी मुंबई मनपाच्या आरोग्य, उद्यान व शिक्षण विभागात भ्रष्टाचार

नवी मुंबई मनपाच्या आरोग्य, उद्यान व शिक्षण विभागात भ्रष्टाचार

आमदार मंदा म्हात्रे यांचा आरोप; आयुक्तांची घेतली भेट

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिकेने क्षेत्रातील उद्यान विभागाची सर्व कामे मुंबईतील मे.एन.के.शाह इन्फ्राप्रोजेक्ट्स या एकाच ठेकेदाराला देऊनप्रकल्पग्रस्त ठेकेदारांची फसवणूक केली जात आहे. या सोबत महानगरपालिकेच्या आरोग्य, उद्यान व शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी आयुक्तांची भेट घेतली.

नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार गेल्या 22 वर्षांपासून उद्यानाचे संरक्षण व संवर्धनाचे काम कोणतीही दरवाढ न करता अविरत काम करीत आहेत. उद्यानातील कामे, माळी कर्मचार्‍यांचे वेतन तसेच इतर गोष्टींचा भरणा करून पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना बिले अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 2017 पासून जीएसटी लागू केल्यापासून स्थानिक ठेकेदार जीएसटी स्वखर्चातून भरत आहेत. उद्यानातील अगोदर करून घेतलेल्या कामांचे कार्यादेश व देयके देण्यात आलेली नाहीत. 1 ते 16 मे 2020 कालावधीतील संवर्धनाची कामे जुन्या प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी केलेली असताना देखील त्यांचे बिल नवीन ठेकेदारास अदा करण्यात आले आहे. जबाबदारीने काम करणार्‍या स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची फसवणुक करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम महापालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप आमदार म्हात्रे यांनी पत्रातून केला.

हे काम वार्षिक 24 कोटी रुपये, 80 लाख रुपये करून देण्याचे पालिका व मे.एन.के.शहा इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये ठरले आहे. परंतु स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार हे काम 11.30 कोटी रुपयांमध्ये करण्यास तयार आहेत. नवी मुंबईतील झोन एक व झोन दोन या दोन्ही झोनमधील सर्व कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना डावलून नवी मुंबई बाहेरील एकाच ठेकेदाराला कसे देण्यात आले? या मागे काही आर्थिक देवाण घेवाण आहे का? किंवा यामागे राजकीय दबाव आहे का? तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक विभागामधील शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कंत्राट, आरोग्य विभागातील यंत्रणेचे कंत्राट या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ. म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली असून, यासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांजकडेही तक्रार करणार असल्याचा इशारा आ. म्हात्रे यांनी पत्रात या प्रकरणी दिला आहे. यावेळी सर्व प्रकल्पग्रस्त ठेकेदार उपस्थित होते.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp