Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / आता आमरण उपोषण करणार

आता आमरण उपोषण करणार

रिलायन्स इथेन गॅस लाइनबाधित प्रकल्पग्रस्तांचा इशारा

कर्जत : बातमीदार

2018मध्ये इथेन गॅस पाइपलाइन टाकल्यानंतर कर्जत तालुक्यातील काही शेतकर्‍यांना रिलायन्स कंपनीने अद्याप मोबदला दिला नाही. याबाबत आवाज उठविणार्‍या शेतकर्‍यांनी 19 ऑगस्ट रोजी कर्जत येथे साखळी उपोषण केले होते, मात्र प्रशासनाने त्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आता प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जमिनीचा मोबदला मिळाला नाही तर आता होणारे उपोषण आमरण असेल, असे शेतकर्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, नसरापूर, कडाव येथील शेतकर्‍यांनी 19 ऑगस्ट रोजी संघटीत होऊन अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला आणि मागण्यांसाठी साखळी उपोषण केले होते. त्या वेळी शेतकर्‍यांनी उपोषण स्थगित करावे म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख यांनी विनंती केली. या संदर्भात सक्षम प्राधीकारी यांना पत्रव्यवहार करून शेतकर्‍यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी विनंती केली जाईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले होते. या आश्वासनाला जवळपास महिना होत आला, मात्र कोणत्याही प्रकारची माहिती अथवा बोलावणे शेतकर्‍यांना कंपनी अथवा भूसंपादन विभागाकडून आले नाही. संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.

प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, उमेश राणे, कृष्णा शिंगे, रोहित राणे, रघुनाथ तरे, प्रशांत बैलमारे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.  आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा लढा राजेश भगत हे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असून, लवकरच शेतकरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट  घेणार आहेत.

शेतकर्‍यांची फसवणूक

प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सक्षम प्राधीकारी, रिलायन्स प्रकल्प अधिकारी तसेच शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. या शेतकर्‍यांची दलालांमार्फत फसवणूक करण्यात आली असून, खोटे पंचनामे करून मूळ शेतकर्‍याला मोबदला न देता डमी व्यक्ती उभी करून पंचनामे केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पाइपलाईन टाकण्यासाठी कंपनी प्रशासनाकडून पोलिसी बळाचाही वापर करण्यात आला. त्यामुळे वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यावाचून पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp