Wednesday , October 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / मोड काढलेली कडधान्ये म्हणजे पोषणाचा खजिना

मोड काढलेली कडधान्ये म्हणजे पोषणाचा खजिना

आरोग्य प्रहर

कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. ‘क’ जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यात तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अ‍ॅसिड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर. टॅनिनमुळे लोहाच्या शोषणात अडथळा निर्माण होतो व फायटीक आम्लामुळे चुन्याचे शोषण कमी होते. ट्रिप्सीन इनहीबीटरमुळे ट्रिप्सीन नावाच्या एन्जाइम निर्मितीत अडथळा येतो. त्यामुळे कडधान्याचे पचन नीट होत नाही आणि पोट जड होते.

कडधान्य रात्रभर भिजत ठेवली तर त्यातील टॅनिन व फायटीक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते. कडधान्य मोड आणून चांगली शिजवली तर ट्रिप्सीन इनहीबीटरचा नाश होतो. शिजवताना आमसूल व चिंचेसारखे थोडेसे आंबट पदार्थ टाकले तर घातक द्रव्ये पूर्णपणे नष्ट होतात. महाराष्ट्रात कडधान्यांना मोड आणून खाण्याची परंपरा आहे.

त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजित होऊन चांगले बदल घडतात. मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने अनेक फायदे होतात. प्रथिने पचायला सोपी होतात. सर्व जीवनसत्त्वांची अनेक पटीने वाढ होते. मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यात ‘क’ जीवनसत्त्व दोन ते सहा मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅमपर्यंत वाढते. मोड आणण्याच्या प्रक्रियेत कडधान्य हलकी व पचायला सुलभ होतात. सुकविलेले मोड काही वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात. अशी कडधान्ये प्रथिने, कार्बोदके आणि जीवनसत्त्वांनी समृध्द असतात.

मोड आणण्याच्या प्रक्रियेत प्रथिने आणि कार्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कार्बोदकांची पाचकता दुपटीने आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि

कार्बोदके यांचा एक समृध्द खजिना मोड आलेल्या कडधान्यात आहे. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp