Wednesday , October 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / आर्थिक हितसंबंधांतून ‘त्या महिलेची प्रियकराकडून हत्या

आर्थिक हितसंबंधांतून ‘त्या महिलेची प्रियकराकडून हत्या

मोर्बे जलाशयात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – तालुक्यातील मोर्बे जलाशयात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या हातातील बांगड्या आणि गोंधण यावरून पटवून पनवेल तालुका पोलिसांनी आरोपींना 48 तासांत सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. संबंधित महिलेच्या प्रियकराने आर्थिक हितसंबंधांतून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. 19) ही माहिती दिली.

मोर्बे धरणाच्या जलाशयामध्ये 16 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रस्सीने व तारेने एका सिमेंटचे पोलभोवती गुंडाळून बांधलेल्या स्थितीत 30 ते 35 वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले होते. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मृतदेह पाण्यात जास्त काळ राहिल्याने तो सडलेल्या व फुगलेल्या अवस्थेत होता. चेहरा विद्रुप झालेला असल्याने ओळखण्याच्या स्थितीत नव्हता.  अंगावर कोणत्याही प्रकारचे कपडे नसल्याने व संपूर्ण प्रेत फुगल्याने चेहर्‍यावरून मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते.

पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 अशोक दुधे, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रवीण पाटील, पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी गुन्ह्याचा तपास चालू केला. मयताच्या एका हातात असलेल्या बांगड्या व गोंदलेले चिन्ह या छोट्याशा पुराव्यावरून साक्षीदारांच्या मार्फत मृतदेहाची ओळख 12 तासांच्या आत पटवण्यात यश प्राप्त झाले आहे.

मृतदेह हा आकुर्ली येथे राहणार्‍या एका 27 वर्षीय महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेचे कोप्रोली गावातील 32 वर्षीय युवकाशी अनैतिक संबंध असल्याची  माहिती मिळाली तसेच महिलेकडून त्याने काही रक्कमही घेतलेली असून, या पैशावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. त्या वादातून त्यानेच साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याबाबत बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावर त्या युवकाचा शोध सुरू झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो गावातून पसार झाला होता. संशयित आरोपी हा त्याचे इतर साथीदार व मयत महिलेच्या लहान मुलीसह सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे तपास पथक तेथे पाठविण्यात आले. तपास पथकाने कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गोडसे व त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन 32 वर्षीय युवकासह त्याचे तीन साथीदार यांनाही 18 सप्टेंबरला कोरगाव येथून ताब्यात घेऊन पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आणले.

चारही आरोपींना अटक करून गुन्हा 48 तासांच्या आत उघडकीस आणण्यात पनवेल तालुका पोलीस ठाण्याला यश आले आहे. अटक आरोपींच्या ताब्यात मयत महिलेची सात वर्षीय मुलगीही मिळून आली. याबाबत बालकल्याण अधिकारी रायगड यांच्याकडून आदेश प्राप्त करून घेऊन सुरक्षिततेसाठी सद्या बालगृहात तिला ठेवण्यात आले आहे.

गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय खेडकर, नितीन पगार, नितीन बडगुजर, सहाय्यक निरीक्षक योगिता कुदळे, उपनिरीक्षक सुनील गुरव, हवालदार मंगेश महाडीक, शंकर अवतार, अजित म्हात्रे, अमोल कांबळे, मंगेश भूमकर, बाबाजी थोरात, सागर रसाळ, राकेश मोकल, संदीप चौधरी, लिंबाजी कायपलवाड यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp