Wednesday , October 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या प्रस्तावित मुख्यालयात संदर्भ विभागासह एक सुसज्ज वाचनालय आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, बास्केट बॉल कोर्ट व इनडोअर क्रीडा संकुल असावे, अशी मागणी केली.

पनवेल महानगरपालिकेची महासभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.  महासभेत प्रस्तावित पालिका मुख्य कार्यालयाचा आराखडा मांडण्यात आला. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रस्तावित क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचा ठरावही चर्चेसाठी आला होता. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र होणे हे गरजेचे असून, त्यांचबरोबर जागा मोठी असल्याने त्यामध्ये एक आंतराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, बास्केट बॉल कोर्ट व इनडोअर क्रीडा संकुलदेखील असावे जेणेकरून क्रीडा क्षेत्रातील युवांना त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल, अशी मागणी पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे नगरसेवक, पत्रकार, संशोधक यांच्याकरिता पालिकेच्या प्रस्तावित कार्यालयात एक सुसज्ज वाचनालय आणि सुसज्ज असा संदर्भ विभागही असला पाहिजे ज्यामध्ये नगरसेवकांना जुने महासभेचे ठराव, इतिवृत्त, सरकारी अधिनियम-अधिसूचना, सरकारी नियमावली अश्या विषयांचे संदर्भ अभ्यासाकरिता उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले.

ऑनलाइन महासभेत खूप तांत्रिक अडचणी येतात, अनेक वेळा महत्त्वाच्या क्षणी संपर्क तुटतो. आता सर्वच गोष्टी बर्‍यापैकी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे पुढील महासभा कोविड नियमावलीचे पालन करून प्रत्यक्ष स्वरूपात भरविण्यात यावी, असे पाटील यांनी सूचविले आहे.

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp