Wednesday , June 3 2020
Home / महत्वाच्या बातम्या / गरिबांच्या पोटावर कदापि पाय येऊ देणार नाही : निलेश बावीस्कर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

गरिबांच्या पोटावर कदापि पाय येऊ देणार नाही : निलेश बावीस्कर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

खारघर : प्रतिनिधी

गरिबांच्या पोटावर मी कदापि पाय येऊ देणार नाही, अशी ग्वाही भाजप नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी ‘रामप्रहर’शी बोलताना दिली आहे. खारघर सेक्टर 15 येथील भाजी मार्केटमध्ये घडलेल्या घटनेबाबत कर्नाळा वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताचा त्यांनी समाचार घेत आपली वस्तूनिष्ठ बाजू मांडली. आपल्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. नगरसेवक बावीस्कर म्हणाले की, खारघर स्पॅगेटीसमोरील भाजीमार्केट अनेक वर्षांपासून सुरू आहे. शेकडो गरीब कुटुंबांचे पोट या मार्केटवर चालते. काही दिवसांपूर्वी हे मार्केट अचानकपणे कोसळले. त्यानंतर अनेकांनी याठिकाणी राजकारण करण्यास सुरुवात केली. संबंधित जागा मयेकर कुटुंबीयांनी स्वतःची असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या जागेचे कागदपत्र सादर करून ही जागा त्यांच्या मालकीची आहे, हे सिद्ध करावे असे मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना मयेकर कुटुंबीयांच्या सदस्यांनी येथील भाजी व्यवसाय करणार्‍या गरीब महिलांना मारहाण केली. संपूर्ण प्रकरणाचे साक्षीदार पोलीस आहेत. अशावेळी मला या प्रकरणात गोवण्यासाठी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु गरिबांच्या पोटावर मी कदापि पाय येऊ देणार नाही, असे भाजप नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी कर्नाळा वृत्तपत्रात आलेली बातमी व त्या बातमीतील भाषा पाहून मला या वृत्तपत्राची कीव येते असे सांगून बावीस्कर यांनी नमूद केले की, माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात माझ्यावर यापूर्वी एक एनसीदेखील दाखल नाही. सेक्टर 15 मधील भाजी मार्केटवर शेकडो गरीब कुटुंबीयांची रोजीरोटी आहे. मयेकर कुटुंबातील सदस्यांनी जेसीबीच्या सहाय्याने सर्व मार्केट उद्ध्वस्त केले. येथील भाजी व्यवसाय करणार्‍या गरीब महिलांना मारहाण केली. कर्नाळा वृत्तपत्राला ते दिसले नाही का? महिलांच्या विषयी आदर आहे; तर दुसरी बाजूदेखील मांडा. मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी श्री दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या मार्फत भाजी मार्केट सुरू आहे. तेव्हा या भाजी मार्केटला कोणीच का विरोध दर्शविला नाही? संबंधित भाजी मार्केट सिडको, तसेच एमआयडीसीच्या मालकीचे आहे. मुद्दामहून माझ्यासह भाजपला बदनाम करण्यासाठी या मार्केटवरून राजकारण सुरू आहे. 25 मार्चला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला तेव्हा मी पनवेल महानगरपालिकेत होतो. त्यानंतर मी भाजी मार्केटला पोहचलो त्या वेळी सर्व पोलीस समोर होते. माझ्यावर लावलेला विनयभंगाचा आरोप खोटा असून, सत्य लवकरच बाहेर येईल. मयेकर कुटुंबीयांशी माझा वाद नाही. संबंधित जागा त्यांच्या मालकीची असल्यास त्यांनी सिद्ध करावे.  माझ्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी मयेकर कुटुंबीयांच्या सदस्यांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये मधू मयेकर, कुंदन मयेकर, कृष्णा मयेकर, विजय मयेकर आदींसह महिलांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा येथील भाजी व्यवसाय करणार्‍या महिलांनी दाखल केला आहे. तो राग मनात धरून मयेकर कुटुंबीयांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. संबंधित भगिनीला मी ओळखतसुद्धा नाही. या सर्व प्रकरणाला रंगवून खोटी बातमी देण्यात आली आहे. लवकरच सर्व समोर येईल, असे शेवटी भाजप नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी म्हटले आहे.

Check Also

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद

रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील सर्वांत जुने असलेले धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद …

Leave a Reply

Whatsapp