Tuesday , January 19 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / शेलू स्टेशनला एकही लोकल थांबत नाही; प्रवाशांची परवड

शेलू स्टेशनला एकही लोकल थांबत नाही; प्रवाशांची परवड

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील शेलू स्थानकात सध्या सुरू करण्यात आलेली एकही लोकल थांबत नाही. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या 23 उपनगरीय लोकल गाड्या आणि 10 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्या यांना मुंबई सीएसएमटीपासून कर्जतपर्यंत फक्त शेलू स्थानकात थांबा नाही. तसे पत्रक मध्य रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. दरम्यान, शेलू स्थानकातून प्रवास करणार्‍या आजूबाजूच्या गावातील अत्यावश्यक सेवेमधील प्रवाशांना नेरळ येथे येऊन उपनगरीय पकडावी लागत असल्याने हे प्रवासी संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर वांगणी आणि नेरळ स्थानकां दरम्यान शेलू हे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून नोकरी आणि व्यवसाया निमित्त शेलूसह बांधिवली, भडवळ, दामत, अवसरे, मानिवली, मोहिली, निकोप आदी गावातील प्रवासी प्रवास करीत असतात. लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेल्या उपनगरीय लोकलची सेवा आता सुरू करण्यात आली आहे. त्या गाड्यांत रेल्वे कामगार तसेच अत्यावश्यक सेवेतील कामगारांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई-कर्जत या मार्गावर सध्या 23 लोकल चालवल्या जात असून,  त्या भिवपुरी रोड, शेलू, वांगणी या स्थानकात थांबत नाहीत. त्यामुळे हे प्रवासी रात्री नेरळ येथे उतरून शेलू, भिवपुरी, वांगणी असा प्रवास दुचाकी किंवा सायकलवरून करीत असतात. आता मध्य रेल्वे प्रशासनाने 10 ऑक्टोबरपासून मेन लाईनवर कर्जत करीता चार अतिरिक्त गाड्यांची वाढ केली आहे. मात्र त्या गाड्यादेखील शेलू स्थानकात थांबणार नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमधील कामगारांना पूर्वीसारखेच नेरळ स्थानकात उतरून रात्री अपरात्री आपल्या घरी पोहचावे लागते. त्यात रात्री रिक्षाही मिळत नाहीत, त्यामुळे नेरळ येथून शेलू, वांगणी येथे पोहचणे धोक्याचे झाले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यासाठी मेन लाईनवर सुरू करण्यात आलेल्या लोकल मुंबईपासून कर्जतपर्यंत शेलू वगळता सर्व स्थानकात थांबतात. या अतिरिक्त आणि अन्य लोकल गाड्या या शेलू स्थानकात थांबवण्यात याव्यात, अशी मागणी शेलू रेल्वे प्रवासी संघटनेचे अर्जुन तरे यांनी केली आहे.  शेलू स्थानकातील प्रवासी मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकावर नाराज असून ते सर्व संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

Check Also

रस्त्याच्या मध्यभागी मोबाइल टॉवरची उभारणी

कामोठेकरांचा संताप पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग आणि मानसरोवर रेल्वेस्थानक यांना जोडणारा रस्ता हा कामोठ्यातील …

Leave a Reply

Whatsapp