Breaking News

देवदूतांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना आधार; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान

मुंबई ः हरेश साठे

कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूताप्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमीच असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. 14) राजभवन येथे केले. कोरोना वैश्विक महामारी काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करीत देवदूताप्रमाणे प्रामाणिक कार्य करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनमध्ये समारंभपूर्वक ’कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. दै. शिवनेरच्या वतीने बुधवारी सायंकाळी झालेल्या या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, दै. राम प्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, अमोघ ठाकूर, स्वप्निल ठाकूर आदी उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले की, अमेरिका प्रगतशील देश आहे. तेथे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे, मात्र तरीसुद्धा ते कोरोनाचा मृत्यूदर कमी करू शकले नाही. कोरोना वैश्विक महामारीने जगभर थैमान घातले असताना भारतात कोरोनाचा मृत्यूदर सर्वांत कमी तसेच रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. याचे श्रेय आपल्या देशातील सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच निःस्वार्थ सेवा करणार्‍या कोरोना देवदूतांना जाते, असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वेळी नमूद केले. कोरोनाला नागरिक यापूर्वी खूप घाबरायचे, पण आता सर्वांच्या प्रयत्नातून ही भीती हळूहळू नष्ट होत आहे. आपला देश धर्मप्रधान आहे. देशात विविध धर्म-पंथांचे लोक एकत्रितपणे राहत असून सर्वांना धर्माप्रति आस्था आहे. भगवान बुद्धांची करुणा सर्वांच्या हृदयात सामावली आहे, असे सांगूना देशातील एकात्मता सरस असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कोरोना आपल्यासारख्या लोकांच्या करुणामय स्वभावाने आणि कार्याने हरणार आहे. त्यामुळे यापुढेही असेच सेवाभावी कार्य करीत राहा, असा मार्गदर्शक सल्लाही राज्यपालांनी या वेळी दिला. सोहळ्याचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे निमंत्रक व दै. शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.

संकटकाळात जनसामान्यांच्या पाठीशी असणारे व्यक्तिमत्त्व

80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण असे समीकरण असले तरी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंच्या मदतीत कधीही राजकारण केले नाही. सदैव त्यांना मदत केली. लोकांवर आलेले संकट आपले मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम केले. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व अशी त्यांची जनमानसावर प्रतिमा कोरली गेली. अनेक वर्षे जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने व जातीने लक्ष देणारे, सतत माणसांत रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लॉकडाऊन काळात हातावर पोट असणार्‍यांची उपजीविका अडचणीत आली. माणूस केवळ दौलतीने नाही, तर दानत व माणुसकीने मोठा होतो याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. कोरोना महामारीत दानत व माणुसकीचे दर्शन घडवत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखोंना मदतीचा हात दिला. स्वखर्चातून दीड लाखांहून अधिक अन्नधान्याचे किट्स, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वच्छता मोहीम, आर्थिक मदत याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणेशोत्सव गोड करण्यासाठी 60 हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य अशी हरएक आवश्यक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना झाली. महापूर असो वा आपत्कालीन परिस्थिती गोरगरिबांना मदत करणारे, विविध सामाजिक उपक्रम राबविणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने समाजाला कल्पवृक्ष मिळाला आहे. त्यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. त्यामुळेच त्यांना समाजात मान-सन्मान व त्यांच्या शब्दाला किंमत आहे. कोरोना काळात त्यांनी समाजाला स्वतःचे कुटुंब मानून केलेल्या मदतीची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ’कोरोना देवदूत’ पुरस्काराने त्यांचा केलेला सन्मान म्हणजेच पनवेलसह रायगडचा सन्मान असल्याचे चित्र या सोहळ्यात प्रकट होत होते.

लहानपणापासून खूप काबाडकष्ट केले. कष्टाने आर्थिक सुबत्ता आली असली तरी मागील दिवस विसरायचे नाही हे ध्येय मनात कायम ठेवले. मी व्यवसायात कोट्यवधी रुपये कमावले, पण ते माझे नाहीत. त्यात समाजाचा वाटा आहे असे मी मानतो. म्हणून मी समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. पक्षविरहित काम करणे हा आपला आत्मा आहे. त्यामुळेच कार्य करण्याची ऊर्जा मिळते. कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत, आदर्श व पितृतुल्य व्यक्तिमत्त्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा अत्यानंद आहे.

-माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर

कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलिसांनी अद्वितीय कार्य केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या काळात केलेले काम मोठे आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आमदारपदाची पर्वा न करता टोलसंदर्भात आंदोलन उभारून टोलविरोधात सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडमध्ये विकास व शिक्षणाचे कार्य मोठ्या प्रमाणात केले असून ते जननायकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याला माझा नेहमी सलाम. महाराष्ट्राने आम्हाला खूप मोठे केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांची परंपरा आपण कधीही विसरू शकत नाही.               – कृपाशंकर सिंह, माजी गृहराज्यमंत्री

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply