Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / मुंबई इंडियन्सचा ‘पंच’

मुंबई इंडियन्सचा ‘पंच’

आयपीएल-13चे पाचव्यांदा विजेतेपद

दुबई : वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दुबई येथे खेळल्या गेल्या आयपीएल-13च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्स संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवित एकतर्फी मात केली. मुंबईने दिल्लीचा डाव 156 धावांवर रोखला होता. हे आव्हान त्यांनी पाच गडी राखून पार केले.
कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबईसमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 18.4 षटकांत विजय मिळवला. रोहितने पाच चौकार व चार षटकारांसह 51 चेंडूंत 68 धावांची निर्णायक खेळी केली. त्याला ईशान किशनने 19 चेंडूंत 33 धावा करीत चांगली साथ दिली.
त्याआधी दिल्लीची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेला मार्कस स्टॉईनिस खाते न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर तिसर्‍या षटकात अजिंक्य रहाणेनेही दोन धावा करून बाद झाला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेला शिखर धवनही स्वस्तात निपटला. 3 बाद 22 धावा अशा स्थितीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या 96 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेरच्या षटकांत मात्र दिल्लीकर धावगती वाढवू शकले नाही. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी करीत चार षटकांत 30 धावा देऊन तीन बळी घेतले.

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp