Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी ठेवायची?

गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी ठेवायची?

·        दिवाळीसाठी सुचवलेल्या 10 कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी एका पंधरवड्यातच परंपरागत गुंतवणूक पर्यायांच्या वार्षिक परताव्यापेक्षा चौपट परतावा दिलेला आढळून येतो, मात्र आता प्रश्न आहे की अशा शेअर्समधून गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी तशीच ठेवून द्यायची आणि जर ठेवून द्यायची तर किती अवधीसाठी आणि किती वृद्धी होईपर्यंत?

मागील दोन आठवड्यांत निफ्टी निर्देशांक जवळपास पाच टक्क्यांनी वधारला, तर ज्युबिलंट फूड 16 टक्के, इन्फो एज 10 टक्के, आयटीसी 10 टक्के, आयसीआयसीआय बँक आठ टक्के, डिव्हिज लॅब सात टक्के, डी मार्ट पाच टक्के, एसबीआय लाईफ पाच टक्के वरती गेले. रिलायन्स इंडस्ट्रीज सहा टक्के खाली आला आणि इन्फोसिस व एशियन पेंट्स जवळपास जैसे थे राहिलेले आढळून येतील. खास दिवाळीसाठी सुचवलेल्या 10 कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी एका पंधरवड्यातच परंपरागत गुंतवणूक पर्यायांच्या वार्षिक परताव्यापेक्षा चौपट परतावा दिलेला आढळून येतो, मात्र आता प्रश्न आहे की अशा शेअर्समधून गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी तशीच ठेवून द्यायची आणि जर ठेवून द्यायची तर किती अवधीसाठी आणि किती वृद्धी होईपर्यंत? याच्या उत्तराकडे जाताना जिलेट कंपनीच्या मोठ्या भागधारकाचे उत्तर फार काही सांगून जाते. त्याला विचारले गेले की, त्यांच्याकडील जिलेटचे शेअर्स ते कधी विकणार? यावर त्यांचे उत्तर होते की, जेव्हा लोक दाढी करायचे थांबवतील! गमतीचा भाग सोडल्यास जेव्हा कंपनीची व्यवसायवृद्धी थांबेल अथवा कंपनीच्या नफ्यातील वाढ कायमस्वरूपी खुंटेल तेव्हाच अशा कंपनीचे शेअर्स विकण्यात अर्थ आहे.

·        मागील आठवड्यात सुरू केलेला विषय पुढे नेण्याआधी गुंतवणुकीच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाचा मुद्दा आज मांडत आहे. जी रक्कम आपण घालवू शकतो तीच रक्कम गुंतवणूक म्हणून करावी असे नेहमीच शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या बाबतीत बोलले जाते. याचे कारण म्हणजे आपण आपल्या गुंतवणूक केलेल्या रकमेपेक्षा त्यावर (भविष्यात) होणार्‍या नफ्यावर जास्त अवलंबून असतो आणि वाढीव नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाने कळत नकळत जास्त जोखीम पत्करत असतो आणि इथेच खरी मेख होते. अपेक्षित नफा न मिळाल्यास त्यावरील गृहीतके कोलमडू शकतात. याउलट शेअर बाजारातील गुंतवणूक जर ही दीर्घ अवधीसाठी केलेली असल्यास नजीकच्या उद्दिष्टांसाठी त्यावर विसंबून न राहिल्यानेच म्हणजेच त्याकडे दुर्लक्ष केल्याने खर्‍या अर्थाने भांडवल वृद्धीस वाव मिळतो.

·        आता गुंतवणूक म्हटली की दोन मूलभूत गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे भांडवल वृद्धी व भांडवल संस्करण. अनेक गुंतवणूकदार आपल्या सुरुवातीच्या म्हणजे उमेदीच्या दिवसांत भांडवल संस्करणावर जास्त प्राधान्य देतात आणि उतरत्या आयुष्यात बचत कमी पडेल असे वाटल्याने भांडवल वृद्धीवर भर देतात आणि अडचणी निर्माण होतात. त्यामुळे भांडवल वृद्धी आणि भांडवल संस्करण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यात बरोबरीने शेअर्सची निवड करताना ती वृद्धीसाठी (Growth stocks) की मूल्यवर्धित (Value stocks) हे ज्याचे त्याने ठरवावे. भांडवल वृद्धीच्या उद्दिष्टाने घेतलेले शेअर्स उचित परतावा मिळाल्यास त्यातून हळूहळू बाहेर पडून मिळालेला नफा संस्करणासाठी इतर तुलनात्मक कमी जोखमीच्या तरल मालमत्ता प्रकारात गुंतवणे कधीही योग्य. अथवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही भाग हा बचावात्मक अशा व्हॅल्यू स्टॉक्ससाठी राखीव ठेवून त्यापासून नियमित उत्पन्न मिळवणे हादेखील सूज्ञ गुंतवणुकीचा एक पैलू ठरू शकतो. त्याचप्रमाणे दरवर्षी

·        आपला पोर्टफोलिओ पुनर्संतुलित करणे अत्यंत आवश्यक आहे.

·        इन्फो एज : सर्व व्यवसाय हा ऑनलाइन असणारी कंपनी असून प्रामुख्याने तीन विभागांत या कंपनीचे व्यवसाय येतात. नोकरभरती (naukri.com), जमीन जुमला (99acres.com), शिक्षण (shiksha.com) व लग्न जुळवणी (jeevansathi.com) संबंधित ऑनलाइन प्रणाली आणि विकसनशील व्यवसायात गुंतवणूक. याखेरीज घरपोच खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणार्‍या झोमॅटो कंपनीतदेखील जवळपास 23 टक्के हिस्सेदारी आहे.

आयटीसी : सिगारेट आणि सिगार यांसाठी प्रामुख्याने नावारूपास आलेली भारतातील सर्वांत जुन्या कंपन्यांपैकी एक अशी इंडियन टोबॅको कंपनी म्हणजेच आयटीसी या कंपनीने आपल्या व्यवसायातही वैविध्य आणले आहे. ब्रँडेड पॅकेज्ड फूड्स (B Natural,Yippee, Wonderz मिल्क), स्टेपल (aashirwad आटा), बिस्किट्स (sunfeast) पर्सनल केअर (Savlon, engage बॉडी स्प्रे, kaya kalp spa), एज्युकेशन अ‍ॅण्ड स्टेशनरी (classmate वह्या), अगरबत्ती (मंगलदीप अगरबत्ती) आणि काड्यापेटी (Aim व होम लाईट), लाइफ स्टाईल रिटेलिंग (Wills तयार कपड्यांची श्रेणी), हॉटेल (आयटीसी हॉटेल्स), पेपरबोर्ड व स्पेशलिटी पेपर्स, पॅकेजिंग, अ‍ॅपग्री-बिझिनेस (e-chaupal) आणि आयटी (आयटीसी इन्फोटेक) अशा विविध गोष्टींवरून या कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप समजू शकतो.

·        एसबीआय लाईफ : मागील काही वर्षांत तरुण पिढीमध्ये आयुर्विम्याच्या बाबतीत जागरूकता वाढलेली आढळून येते. आजपर्यंत जरी विमा म्हटले की एलआयसी हेच समीकरण होते तरी 90नंतरच्या काळात या क्षेत्रात खूप बदल झालेले आढळून येतात. या क्षेत्रातील खासगीकरणामुळे जगातील दुसर्‍या मोठी लोकसंख्या असणार्‍या देशाला स्टेट बँकेच्या एकूण शाखा व त्यांचा ग्राहकवर्ग पाहता ही कंपनी मला व्यवसाय वृद्धीच्या आवाक्यासाठी उजवी वाटते. एसबीआय लाईफ इन्शुरन्स ही स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक संयुक्त उद्यम जीवन विमा कंपनी असून ती भारतातील सर्वांत मोठी सरकारी बँक आणि वित्तीय सेवा कंपनी बीएनपी परिबास कार्डीफ यांच्यात आहे. बीएनपी परिबास ही एक फ्रेंच बहुराष्ट्रीय बँक आणि पॅरिसमधील जागतिक मुख्यालय असलेली वित्तीय सेवा कंपनी आहे.

·        आयसीआयसीआय बँक : देशातील सर्वांत मोठी दुसरी खासगी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक. ही बँक कॉर्पोरेट आणि किरकोळ ग्राहकांना विविध वितरण वाहिन्यांद्वारे आणि त्याच्या ग्रुप कंपन्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बँकिंग उत्पादने आणि वित्तीय सेवा उपलब्ध करते.

·        डिव्हिज लॅब : या महामारीत सर्वांत जास्त चर्चेत आलेली कंपनी म्हणजे डिव्हिज लॅब. 1990मध्ये स्थापन झालेली, तीन उत्पादन प्रकल्प, स्वतःची तीन संशोधन केंद्र व 14000 कामगार असलेली 30 वर्षांपासून सेवेत असलेली कंपनी असून लॅबोरेटरीज अ‍ॅवक्टिव्ह फार्मा इंजिनियंट्स (एपीआय) व इंटरमीडिएट्स बनवते. डिव्हिज लॅबोरेटरीज अ‍ॅफक्टिव्ह फार्मा इन्ग्रिडण्ट्स (एपीआय) व इंटरमीडिएट्सच्या उत्पादनासाठी नवीन प्रक्रिया विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतात.  

·        इन्फोसिस : बहुपरिचित इन्फोसिस व्यवसाय सल्लामसलत, तंत्रज्ञान, आऊटसोर्सिंग व नेक्स्ट जनरेशन डिजिटल सेवा पुरवणारे अग्रणी प्रदाता आहे. ही कंपनी ग्राहकांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनाची रणनीती पार पाडण्यास सक्षम करते. कर्मचार्‍यांना वाढीची संधी देताना व गुंतवणूकदारांना फायदेशीर नफा मिळवून देत ग्राहकांच्या कार्यपद्धतीसंबंधी शाश्वत संस्था तयार करणे हे इन्फोसिसचे धोरणात्मक उद्दिष्ट आहे.

·        -प्रसाद ल. भावे (9822075888)

·        [email protected]

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp