Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पालीत माकडांचा उच्छाद

पालीत माकडांचा उच्छाद

उपद्रव व हल्ल्यांमुळे नागरिक हैराण

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याती पाली गावात माकड व वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही लोकांवर देखील या माकडांनी हल्ले करून जखमी केले आहे.

या उपद्रवी माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत स्थानिक रहिवाशी व्यक्त करत आहेत.

पालीमधील राम आळी, बाजारपेठ,  देऊळवाडा,  मधली आळी,  खडकाळी, कासार आळी, सोनार आळी, आगर आळी, बेगर आळी, उंबरवाडी, सावंतआळी अशा  गजबजलेल्या भागात माकडे आणि वानरे रोज धुमाकूळ घालत आहेत. मोठमोठी वानरे आणि माकडे छतावर उड्या मारून घराचे पत्रे व कौले फोडतात. तसेच ड्रेनेजचे पाईप,  विजेच्या तारा, गच्चीत  ठेवलेले सामान,  पाण्याच्या टाक्या, झाडाच्या कुंड्या, झाडे यांचे नुकसान करीत आहेत. वाळत घातलेले कपडेदेखील फाडून टाकतात. त्यामुळे आर्थिक हानी होत आहे. इतकेच नव्हे तर ही माकडे घरात शिरून अन्नधान्य, भाजीपाल्यांची नासाडी करतात. त्यामुळे घराची दारे, खिडक्या उघड्या ठेवणे अवघड झाले.

माकडे आणि वानरे यांना पकडण्यासाठी आर्थिक किंवा इतर तरतूद वनविभागाकडे नाही. ग्रामपंचायत किंवा देवस्थान समिती यांच्या आर्थिक मदतीतून माकडे पकडणारी टीम बोलवता येऊ शकते. नागरिकांनी माकडांना घरचे तसेच शिजविलेले अन्न खाण्यास देऊ नये. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्यामुळे माकडांचा उपद्रव आटोक्यात येऊ शकेल.

-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड

अनेकांना केले जखमी

वर्षभरात या वानरांनी महिला व लहान मुलांसह अनेकांवर हल्ले करून गंभीर दुखापती केल्या आहेत. दिवसेंदिवस पालीत वानरांची व माकडांची संख्या वाढत आहे. टोळीने येणार्‍या या वानरांना व माकडांना हाकलणे अशक्य होत आहे.

मुरूडमध्ये बैलाचा धुमाकूळ

मुरुड : प्रतिनिधी

येथील बाजार पेठेत एका काळ्या रंगाच्या बैलाने धुमाकूळ घातला असून, या बैलाच्या धडकेने अनेक दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. या मोकाट बैलाने सूर्या सदरे यांच्या आवारात उभ्या असलेल्या दोन दुचाकी वाहनाला धडक दिल्याने त्यांचे आरसे फुटून नुकसान झाले आहे. आधीच मुरुड शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. त्यातच या काळ्या बैलाने दहशत निर्माण केली आहे. नगरपरिषदेने या उनाड बैलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp