Thursday , January 28 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / नाचता येईना अंगण वाकडे अशी उद्धव ठाकरेंची अवस्था

नाचता येईना अंगण वाकडे अशी उद्धव ठाकरेंची अवस्था

खासदार नारायण राणे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी
नाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली आहे. दै. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या ठाकरेंच्या मुलाखतीचा राणेंनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात आपल्या खास शैलीत समाचार घेतला. या सरकारने 65 हजार कोटींचे कर्ज मागील सहा महिन्यांत काढून ठेवले आणि राज्य दिवाळखोरीत नेले, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
खासदार राणे म्हणाले, हात धुवून मागे लागेन अशी धमकी त्यांनी दिली आहे ती नेमकी कशाच्या जीवावर दिली आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्ध्वस्त करणार्‍या मार्गावर जाऊ नये, विकासाच्या मार्गावर जावे. उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
महाविकास आघाडी सरकारवर बोलताना खासदार राणेंनी सांगितले की, हे सरकार तीन पक्षांचे आहे, जनतेशी गद्दारी करून आलेले आहे. ते फार काळ टिकणार नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही राणेंनी भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने नव्हते. त्यांना कधीही मराठा समाजाला, आरक्षणाला समर्थन दिलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील नेमण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘मातोश्री’च्या पिंजर्‍यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकले आहेत. ते कार चालवतात याचे संजय राऊत कौतुक करीत आहेत, मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नको तर सक्षम मुख्यमंत्री हवा आहे, असा टोला खासदार राणे यांनी लगावला. महाराष्ट्रात हे जे तीन पक्षांचे सरकार आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. त्यामुळे हे सरकार जाण्यासाठी जर कुणी प्रयत्न केले तर ते मी गैर मानणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा …

Leave a Reply

Whatsapp