Thursday , January 28 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / संवेदनाशून्य, परावलंबी वर्ष

संवेदनाशून्य, परावलंबी वर्ष

विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर निखारा ठेवण्याचा निर्णय असो, मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न असो, कंगना रणौवतच्या घरावर बेकायदा चालवलेला बुलडोझर असो किंवा टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेचे प्रकरण असो या सर्वच न्यायालयीन लढायांमध्ये ठाकरे सरकार सपशेल तोंडावर पडले. परीक्षेत कुठलाही प्रश्न सोडवण्यात साफ तोंडघशी पडलेल्या विद्यार्थ्याने कोरी उत्तरपत्रिका ठेवून स्वच्छतेच्या गुणांची मागणी केल्यासारखे ठाकरे सरकारचे वर्तन आहे. या सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद कोणालाच होणे शक्य नाही.

अनेक उलटसुलट उठाठेवी करून राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आज शनिवारी एक वर्ष पूर्ण करत आहे. न कर्त्याचा वार शनिवार अशी मराठीत म्हण आहे. सत्तेतील भागीदार तिन्ही पक्ष वर्षपूर्तीच्या आनंदात मशगूल झाले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील सामान्यजन हातात वाढीव वीजबिले फडकवत आपला संताप रस्त्यावर उतरून व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत दिली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणवासियांच्या हातात अजुनही मदतीची रक्कम पडलेली नाही. विदर्भातील पूरग्रस्तांचा टाहो अजुनही सरकारच्या कानावर पडायचा आहे. गाजावाजा करत शेतकर्‍यांना जाहीर केलेली कर्जमाफी हा तर एक करूण विनोद ठरला आहे. कोरोनाशी लढाई चालू असताना ठिकठिकाणाहून घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. कुठल्या मोजपट्टीवर या सरकारचे मूल्यमापन करावयाचे हा प्रश्न राजकीय पंडितांना पडला आहे. कोरोना विषाणूच्या महासंकटामुळे सर्वच राज्यांची परिस्थिती बिकट झाली होती. त्यास महाराष्ट्र देखील अपवाद नाही. अशा अपवादात्मक परिस्थितीत अपयशी ठरल्याबद्दल ठाकरे सरकारला धारेवर धरायचे की त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे. ठाकरे सरकारने गेल्या वर्षभरात केंद्र सरकारवर खापर फोडण्यापलीकडे कुठलेही काम केले नाही. प्रत्येक आघाडीवर लढताना या सरकारने केंद्राकडूनच मदतीची अपेक्षा केली. मग तो विषय निसर्ग वादळग्रस्तांचा असो, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा असो किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा. खर्‍या अर्थाने हे एक परावलंबी सरकार आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे, ती सार्थ वाटते. वर्षभरापूर्वी याच सुमारास पंचतारांकित हॉटेलांमध्ये आमदारांना डांबून ठेवून अनेक विश्वासघातकी मसलती करून सत्ता तर हस्तगत करता आली. पण ती टिकवणे किती अवघड आहे हे ठाकरे सरकारातील नेत्यांना एव्हाना चांगलेच कळून चुकले असेल. आपापल्या खुर्च्या बचावून ठेवणे एवढ्याच एककलमी कार्यक्रमामध्ये या सरकारचे संपूर्ण वर्ष वाया गेले. समन्वयाचा पूर्णत: अभाव असलेले हे महाबिघाडी सरकार स्वत:च्याच ओझ्याने कोसळेल यात शंका नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर हे सरकार कधीच इतिहासजमा झाले असते. कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे त्यांना वर्षपूर्तीचा आनंद घेता येत आहे हे विसरता कामा नये. निदान यापुढे तरी प्रगतीशील महाराष्ट्राला थोडे तरी पुढे नेण्याची कामगिरी महाविकास आघाडी सरकारने करावी अशी माफक अपेक्षा आहे. एक वर्ष कसेबसे पदरात पडले. यापुढे किती काळ सत्तेची ऊब घेता येईल याची शाश्वती नाही. कुठल्याही निर्णयासाठी सदोदित परावलंबित्व स्वीकारावे लागणार्‍या सरकारबाबत कुठलीही शाश्वती देता येणे शक्यच नसते. हे परावलंबित्व झटकून ठाकरे सरकार आतातरी कामाला लागेल अशी आशा आहे.

Check Also

रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा …

Leave a Reply

Whatsapp