पँगाँग भागात मरीन कमांडो तैनात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर क्षेत्रात आपले मरीन कमांडो तैनात केले आहेत. लडाखमध्ये आधीपासूनच तैनात असलेल्या गरूड सैन्य संचलन आणि भारतीय सेनेच्या पॅरा स्पेशल दलाला अधिक मजबूत करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये मरीन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
एकीकरण वाढवणे आणि नौदल कमांडोंना प्रत्येक संकटाचा सामना करण्यास तयार राहण्यासाठी यामुळे मोठी मदत मिळणार आहे. लडाखमध्ये अधिकांश भागांत रक्त गोठवणारी थंडी सुरू झाली आहे.
भारतीय सैन्य आणि चिनी सैनिकांत गेल्या वर्षीपासून तणावाची स्थिती आहे. मरीन कमांडोंच्या तैनातीमुळे भारताची स्थिती सीमेवर मजबूत होणार आहे.
पॅरा स्पेशल फोर्स आणि कॅबिनेट सचिवालयाची स्पेशल फ्रंटियर फोर्सचा समावेश असलेली भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस पूर्व लडाखमध्ये दीर्घकाळापासून विशेष
मोहिमा राबवत आहेत. भारतीय हवाई दलाचे गरूड विशेष दल तणावाच्या सुरुवातीच्या दिवसांत कोणत्याही लढाऊ किंवा अन्य विमानांची देखभाल करण्यासाठी आपल्या संरक्षण प्रणालीसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रणनीतिक उंचीवर पहाडांच्या शिखरावर पोहचले आहे.
सहा महिन्यांपासून विशेष तुकड्या तैनात
भारतीय लष्कर व भारतीय हवाई दलाशी संबंधित विशेष तुकड्या सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून तैनात आहेत. 29-30 ऑगस्टलाही भारतीय पक्षाने विशेष दलांचा उपयोग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबरोबरच रणनीतिकदृष्ट्या उंचींवरील जागांवर कब्जा करण्यासाठी केला होता. चीनला रोखणे हा यामागील उद्देश होता. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आपल्या पक्षात विशेष सैनिकांनादेखील तैनात केले आहे.