Wednesday , January 20 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / आत्मनिर्भर भारतासाठी पुढे या!

आत्मनिर्भर भारतासाठी पुढे या!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तरुणाईला आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 12) व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून दुसर्‍या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात तरुणाईला मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून आत्मनिर्भर भारताची वाट तयार करण्यासाठी देशातील युवा पिढीने पुढे यायला हवे, असे आवाहन केले.
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, काळ पुढे सरकत राहिला, देश स्वतंत्र झाला. तरी आजही आपण पाहतो की स्वामी विवेकानंदांचा प्रभाव कायम आहे. अध्यात्माबाबत जे विवेकानंदांनी सांगितले, जे राष्ट्रवाद-राष्ट्रनिर्माणाबद्दल सांगितले ते सारे विचार आपल्या मनमंदिरात तेवढ्याच तीव्रतेने प्रवाहित होतात. स्वामी विवेकांनंदानी आपल्याला आणखी एक अनमोल भेट दिली आहे. ही भेट आहे व्यक्तीच्या निर्मितीची, संस्थांच्या निर्मितीची, मात्र या सार्‍याची चर्चा फारच कमी होते. विवेकानंदांनीच त्या काळात म्हटले होते निडर, धाडसी, स्वच्छ मनाचे आणि आकांक्षी युवकच या देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहेत.
स्वामीजी म्हणायचे की, जुन्या धर्मांनुसार नास्तिक तो असतो जो ईश्वरावर विश्वास ठेवत नाही, मात्र नवा धर्म म्हणतो की नास्तिक तो आहे जो स्वत:वर विश्वास ठेवत नाही. ते युवकांवर विश्वास ठेवायचे. आपल्याला देशाला पुढे न्यायची संधी गमवायची नाहीये. देशाची पुढील 25 ते 30 वर्षांची वाटचाल महत्त्वपूर्ण आहे. म्हणून युवकांनी या युगाला भारताचे युग बनवण्यासाठी पुढे यावे.
या महोत्सवास लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरन रिजिजुदेखील उपस्थित होते. राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 31 डिसेंबर 2017च्या ‘मन की बात’मध्ये व्यक्त केल्या गेलेल्या विचारांवर आधारित आहे. मागच्या वर्षी 2019मध्ये पहिल्यांदा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
वंशवाद हुकूमशाहीसोबतच अकार्यक्षमतेस चालना देतो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी म्हटले की, आताही असे लोक आहेत ज्यांचा विचार, आचार, ध्येय असे सर्वकाही आपल्या परिवाराचे राजकारण आणि राजकारणातील आपल्या परिवाराला वाचवणे हेच आहे. हा राजकीय वंशवाद लोकशाहीमध्ये हुकूमशाहीसोबतच अकार्यक्षमतेस चालना देतो. राजकीय वंशवाद, राष्ट्र प्रथम याऐवजी फक्त मी आणि माझे कुटुंब याच भावनेला मजबूत करतो. हे भारतातील राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचे महत्त्वपूर्ण कारण आहे.

Check Also

रस्त्याच्या मध्यभागी मोबाइल टॉवरची उभारणी

कामोठेकरांचा संताप पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग आणि मानसरोवर रेल्वेस्थानक यांना जोडणारा रस्ता हा कामोठ्यातील …

Leave a Reply

Whatsapp