शनि मंदिरात समाजबांधवांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
संत तुकारामांचे लेखनिक आणि शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी पनवेल मधील टपालनाका येथील शनिमंदिरात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली.
संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेत. संताजी महाराजांचे तुकोबारायांच्या विचारांशी असलेले तादात्म्य हे कमालीचे एकरूप असल्याचे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष, सुदुंबरे संस्था, सचिव सतीश वैरागी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्याचप्रमाणे सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन समाजासाठी योगदान दिले पाहिजे असल्याचे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महिला रायगड जिल्हा अध्यक्ष प्रिया डिंगोरकर यांनी या वेळी सांगितले.
संताजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ समाजसेवक सुनिल खळदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजबांधव बबन जगनाडे आणि पंचक्रोशीतील शेकडो समाजबांधव उपस्थित होते.