मुरुड : प्रतिनिधी
संजीवनी आरोग्य सेवा संस्थेच्या येथील डायलिसिस सेंटरमध्ये येणार्या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा शुभारंभ नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा लागू झाल्याने आता संस्थेच्या सेंटरमध्ये डायलिसिससाठी माफक खर्च येणार आहे, त्यामुळे रुग्णांनी सुविधेचा फायदा घ्यावा, असे आवाहन संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी या वेळी केले.
सदर योजना लागू करून घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. नागावकर यांचा मोलाचा वाटा असल्याचे विजय सुर्वे यांनी सांगितले. संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध, जिल्हा समन्वयक समरस शेळके, डायलेसिस सेंटर प्रमुख अंजनाबाई लहाने, डॉ. मकबूल कोकाटे, समाजसेवक जहूर कादिर, डॉ. मंगेश पाटील, डॉ. राज कल्याणी आदि उपस्थित होते.