Thursday , January 28 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आज अंतिम सामना; उभय संघांची ‘कसोटी’

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आज अंतिम सामना; उभय संघांची ‘कसोटी’

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारी (दि. 15) ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळविण्यात येत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक सामना उभय संघांनी जिंकला असून, एक सामना अनिर्णीत राहिला असल्याने उरलेला सामन्यात मालिकेचा निकाल लागतो की हाही सामना अनिर्णीत होऊन मालिका बरोबरीत सुटते याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागलेले आहे. भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीतही संघाने बुधवारी गाबा मैदानावर पहिल्या सत्रात कसून सराव केला. चौथ्या तसेच निर्णायक कसोटीत बाजी मारण्यासाठी फिट एकादश उतरविण्याच्या अपेक्षेने सर्व खेळाडू घाम गाळताना दिसले. सिडनीत तिसर्‍या कसोटीदरम्यान पोटाचे स्नायू दुखावल्याने चौथ्या सामन्यात खेळू न शकणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील सरावाच्या वेळी संघासोबत होता. बुमराहने गोलंदाजी कोच भारत अरुण यांच्यासोबत सखोल चर्चा केली. रोहित शर्मा, शुभमान गिल, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अन्य खेळाडू सरावाच्या इराद्याने आले होते. दुखापतग्रस्त खेळाडू हा टीम इंडियासाठी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात कोण-कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार असा उपस्थित होऊ लागला आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जाडेजा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल आणि रविचंद्रन अश्विन हे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आतापर्यंत दुखापतग्रस्त झाले आहेत तसेच मालिकेपूर्वीदेखील काही खेळाडू दुखापतींचा सामना करीत होते. त्यामध्ये इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश होता.

भारताकडून कुणाला मिळणार संधी?

चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने नेटमध्ये बराच वेळ गोलंदाजीचा सराव केला. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे कुलदीपला संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे तसेच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि अष्टपैलू वाशिंग्टन सुंदरही प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाला होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. बुमराहच्या जागी टी. नटराजन किंवा शार्दुल ठाकूर खेळताना दिसू शकतो. शेवटच्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीऐवजी वॉशिंगटन सुंदरला संधी मिळू शकते.

Check Also

रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा …

Leave a Reply

Whatsapp