रस्ते वाहतूक मंत्रालयाची तत्त्वता मान्यता
नेरळ : बातमीदार
भीमाशंकर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी आणि जवळचा मार्ग ठरू शकेल अशा पनवेल-नेरळ-खेड-मंचर या राज्यमार्गाचे काम रखडले आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प अडगळीत टाकला असून, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा द्यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक कर्जतचे सुनील गोगटे यांनी केली होतो. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने या मागणीला तत्त्वता मान्यता दिली आहे. स्वत: गोगटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांनी चार जिल्ह्यांतून जाणार्या पनवेल-नेरळ-खेड-शिरूर या राज्यमार्गाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या रस्ते विकास आराखड्यात पनवेल-नेरे-मालडुंगे-नेरळ-कशेळे-सावळे-तळपेवाडी-वांद्रे-आंबोली-कुडे-घोटवडी-शिरगाव-तळेघर- खेड-शिरूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 103 म्हणून ओळखला जात आहे. पनवेल येथून सुरू होत असलेला हा रस्ता रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जत तालुक्यातून जातो. पुढे पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यातून जात असून, राजगुरूनगर येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला छेदून पुढे शिरूर येथे शिरूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. या रस्त्यामुळे चार जिल्हे जोडले जात आहेत, मात्र 1980च्या राज्य रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या या राज्यमार्गाचे काम अनेक वर्षे रखडले होते.
मुंबईतून भीमाशंकर येथे जाणारे भाविक आणि पर्यटक 268 किलोमीटरचा प्रवास करून जात असतात. त्यांना पनवेल-नेरळ-खेड-मंचर हा राज्यमार्ग भीमाशंकरला जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरू शकतो. जर तो झाला तर किमान 63 किमीचा प्रवास भीमाशंकर येथे जाण्यासाठी कमी होऊ शकतो. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र व घाटमाथ्यावर जे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, दूध उत्पादन होते, ते थेट मुंबईच्या बाजारात आणण्यासाठी राज्यमार्ग 103 हा जवळचा आणि इंधनाची बचत करणारा मार्ग ठरू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने अडगळीत टाकलेला हा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेऊन पूर्ण करावा, अशी मागणी मी नोव्हेंबर 2020मध्ये देशाचे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली होती. (पान 2 वर..)
चार जिल्हे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीच्या जवळ आणण्यासाठी आणि रस्ते वाहतुकीमुळे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हा मार्ग लवकर अस्तित्वात आला पाहिजे, असा यामागचा उद्देश होता. त्यास यश आले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अनेक वर्षे रखडलेल्या भीमाशंकर रस्त्याचे काम मार्गी लागेल, असा विश्वास गोगटे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस गोगटे यांच्यासह भाजप कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत उपस्थित होते.