Sunday , July 25 2021
Breaking News

भाजपच्या वाढत्या दबावानंतर अखेर वनमत्री राठोड यांचा राजीनामा

मुंबई ः प्रतिनिधी
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर रविवारी (दि. 28) मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन वनमंत्री राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला होता.
विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपने संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी करीत अधिवेशनाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. बीडमधील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजासोबतचे फोटो व या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता, तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळे समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राठोड यांचा राजीनामा मंजूर केल्याचे सांगितले आहे.
भाजपचा आक्रमक पवित्रा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनेही करण्यात आली.
पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा ः फडणवीस
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आज 20 दिवस झाले. या प्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत. असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर 20 दिवसांनंतरही एफआयआर दाखल केला नाही. त्यामुळे प्रथम संजय राठोड यांना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जोपर्यंत पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.

हा राजीनामा लोकांचा दबाव, भाजपने केलेले आंदोलन व माध्यमांनी विषय लावून धरल्यामुळे देण्यात आला. हा राजीनामा आधीच द्यायला हवा होता. केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही, तर या प्रकरणी राठोड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. केवळ राजीनामा घेऊन विषय अडगळीत टाकला जाता कामा नये. जे धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवले, तसे धाडस शरद पवार यांनीही दाखवायला हवे होते.
-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

फक्त संजय राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की तिने आत्महत्या केली हे समजेल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे, असे सांगितले जात होते, पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करीत होते?
कुणाची चौकशी करीत होते?
-आशिष शेलार, भाजप नेते

Check Also

मॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य

पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …

Leave a Reply

Whatsapp