Sunday , April 11 2021

जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा नक्षलवाद्यांना इशारा

जगदलपूर ः वृत्तसंस्था
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत 22 जवान शहीद झाले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणची अमित शाह यांनी सोमवारी (दि. 5) पाहणी केली, तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी बोलताना ‘जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही’ असा इशारा त्यांनी नक्षलवाद्यांना दिला.
‘पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने मी या नक्षलवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. या जवानांचे बलिदान देश कायमच लक्षात ठेवले. या जवानांनी नक्षलवादाविरोधात दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील’, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री शाह प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहचल्याचे पहायला मिळत आहे. छत्तीसगडच्या जनतेला आणि देशवासीयांना आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू. या संदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि संरक्षण दलाच्या अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली असून, हा लढा सुरू ठेवला पाहिजे, असे अधिकार्‍यांनी जोर देऊन म्हटले आहे. यावरून आपल्या जवानांचे मनोधैर्य किती उंचावलेले आहे ही बाब दिसून येते.
शाह यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे दोन महत्त्वाच्या गोष्टींवर काम करून नक्षलवादाला तोंड देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. आदिवासी भागामध्ये विकासकामांना गती देणे आणि सशस्त्र लढ्याला चोख उत्तर देण्याच्या माध्यमातून नक्षलवादाविरोधात दुहेरी लढा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
15 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत. या वेळी उडालेल्या धुमश्चक्रीत शूर जवानांनीही 15 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी एकत्रित येत नक्षलवाद्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. तारेम येथून निघालेल्या एका पथकाची जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांच्या एका गटाशी धुमश्चक्री उडाली. सुमारे तीन तासांपर्यंत ही धुमश्चक्री चालली होती. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी रात्री हाती लागले होते, तर 17 जवान बेपत्ता होते. रविवारी सुरक्षा दलांनी जंगलात शोधमोहीम हाती घेतली असता, उर्वरित सर्व जवानांचे मृतदेह सापडले. या चकमकीत 30 जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात दहशतवादी शहीद झाल्याचे अनावधाने छापले गेले होते. वास्तविक, नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp