Sunday , April 11 2021

कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट!

देशात एक लाखांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशातील कोरोना संकट गंभीर झाले असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी (दि. 5) समोर आली. देशात सोमवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये एक लाखांहून अधिक नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशात कोरोनाने पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार देशात एक लाख तीन हजार 558 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 52 हजार 847 जण करोनावर मात करून घरी परतले आहेत, तसेच या 24 तासांच्या कालावधीत देशात 478 जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत एक लाख 65 हजार 101 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 16 सप्टेंबर 2020 रोजी देशात सर्वाधिक 97 हजार 894 रुग्ण आढळून आले होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
देशात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 222 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के असून, आतापर्यंत 55 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर राज्यात सध्या 4,30,503 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि मृतांच्या संख्येतही वाढ पहायला मिळत असल्याने केंद्रीय पथक महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp