Sunday , April 11 2021

लॉकडाऊनला वाढता विरोध

मोहोपाड्यात व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन; ठाकरे सरकारचा जाहीर निषेध

मोहोपाडा ः प्रतिनिधी
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले आणि प्रत्यक्षात मात्र ’ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापार्‍यांचा आहे. वीकेण्डला कडक लॉकडाऊन असताना त्याआधीच दुकानांचे शटर खाली करायला लावल्याने मोहोपाडा, नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठेतील व्यापारी नाराज झाले असून, त्यांनी बुधवारी (दि. 7) सकाळी मोहोपाड्यात ठिय्या आंदोलन, तसेच रास्ता रोको करून ठाकरे सरकारचा निषेध नोंदविला.
या वेळी व्यापार्‍यांनी लॉकडाऊनचे निषेध दर्शविणारे बॅनर घेऊन राज्य सरकारच्या फसवणुकीविरोधात संताप व्यक्त केला. यानंतर छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करून लॉकडाऊनचा तीव्र निषेध केला, तसेच मोहोपाडा प्रवेशद्वार कमानीजवळ ‘रास्ता रोको’ केला. वावेघर बाजारपेठेतील व्यापार्‍यांनीही राज्य शासनाच्या लॉकडाऊनला निषेध दर्शविला.
प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे आम्ही पालन केले आहे व करीत आहोत, मात्र आता सरसकट लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक संकट येईल. ते योग्य नाही. त्यामुळे शासनाने व प्रशासनाने फेरविचार करावा, अशी मागणी मोहोपाडा, नवीन पोसरी  बाजारपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी, सचिव अमित शहा, वावेघर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गुरुनाथ माळी यांनी या वेळी केली.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे विभागप्रमुख सचिन तांडेल, वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच सदीप मुंढे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, एक महिना दुकाने व व्यवसाय बंद राहणार असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. अचानक दुकाने बंद केल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. दुकानाचे भाडे, नोकरांचा पगार, कर्जांचे हप्ते या सर्व समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने व्यापारी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
पनवेल परिसरातील व्यापारीही आक्रमक
पनवेल ः नव्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनविरोधात पनवेल परिसरातील व्यापारी आक्रमक झाले असून, नवीन पनवेलमधील व्यापार्‍यांनी बुधवारी (दि. 7) आंदोलन करीत ठाकरे सरकारचा निषेध केला. नवीन पनवेल व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी अमित धुमाळ, विक्रम भाई, सुमित धुमाळ, सुरेश कुमावत आदी व्यापारी उपस्थित होते. ‘लॉकडाऊन हटाओ, व्यापारी बचाओ’ असे फलक हातात घेऊन त्यांनी संताप व्यक्त केला. लॉकडाऊनविरोधात खारघर आणि कळंबोलीतील व्यापार्‍यांनीही मंगळवारी आंदोलन केले होते. अशा पद्धतीने लॉकडाऊन लावणे योग्य नसल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp