Saturday , October 16 2021
Breaking News

शाळा व्यवस्थापनांच्या मनमानी कारभाराला आळा घालून पालकांना न्याय द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
शाळा फी जमा करण्याचा वारंवार तगादा, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास बंद करणे, तसेच इतर उपक्रमांची फी आकारण्याबरोबरच वाढीव फी भरण्यास दबाव टाकण्याचे काम काही शाळा व्यवस्थापनांकडून केले जात आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात पालकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. या संदर्भात विद्यार्थी व पालकांना न्याय मिळावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन शाळा व्यवस्थापनांचा मनमानी कारभार त्यात अधोरेखित केला आहे. राज्यातील कोरोना साथीची सद्याची परिस्थिती, नागरिकांच्या दैनंदिन हालचालीवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशाची उपलब्धता या बाबी विचारात घेता सर्व बोर्डांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करताना सहानुभूती दाखविण्यासंदर्भात, तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये व लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबतच्या सूचना शासनाने 30 मार्च 2020 रोजीच्या परिपत्रकाद्वारे जारी केल्या आहेत. असे आदेश असतानाही सीबीएसई बोर्डाच्या शाळांमार्फत राज्यातील विशेषतः रायगड जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापनांकडून फी जमा करण्यासाठी पालकांना सातत्याने मानसिक त्रास देणे सुरू झाले असून, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास बंद करणे, लॉकडाऊनच्या काळात इतर उपक्रम बंद असतानाही या उपक्रमांची फी आकारणे तसेच नवीन वर्षात पालकांना कोणतीही कल्पना न देता फी वाढवून त्यांच्यावर वाढीव फी भरण्यास दबाव टाकणे असे प्रकार शाळा व्यवस्थापन जाणूनबुजून करीत आहेत, याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
सद्यस्थितीत कोरोनामुळे कित्येक पालकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत असून, आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे. त्यातच शाळा व्यवस्थापनांच्या मनमानी कारभारामुळे पालकवर्गाला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने पालकांमध्ये शाळा प्रशासनाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे आपला दैनंदिन चरितार्थ सुरू ठेवताना पालकांची होणारी ओढाताण लक्षात घेता शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शाळा व्यवस्थापनांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, तसेच सन 2021-22 या वर्षासाठी सर्व शाळांनी आकारायच्या फीसंदर्भात सुस्पष्ट निर्देश देऊन जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, असा आमदार प्रशांत ठाकूर यांनी उल्लेख करून शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला आळा घालून पालकवर्गाला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp