Wednesday , June 3 2020
Home / महत्वाच्या बातम्या / भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवेल

भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवेल

भाजप नेते माधव भंडारी यांचे रोखठोक प्रतिपादन

पेण : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर 70 हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्याचा आरोप असून, त्यांच्यावर मनी लाँडरिंगप्रकरणीही ठपका आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकरी व गोरगरीब जनतेला फसवणार्‍या, भ्रष्टाचारी व विश्वासघातकी तटकरेंना जनता येत्या 23 तारखेला धडा शिकवणार आहे, असे रोखठोक प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले. ते वरसई येथील सभेत बोलत होते.

शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पेण तालुक्यातील वरसई येथे रविवारी (दि. 14) रात्री जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी भाजप नेते भंडारी बोलत होते.

या सभेस सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, भाजप राज्य परिषद सदस्य संजय कोनकर, जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील, चिटणीस शरद कदम, बंडू खंडागळे, प्रवक्ते मिलिंद पाटील, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, जि. प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, कामगार सेल अध्यक्ष विनोद शहा, आप्पा सत्वे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहेत. बलशाली भारत बनवायचा असेल, तर नेतृत्व मोदींकडेच असणे आवश्यक आहे, असे सांगून आपल्या भाषणात माधव भंडारी म्हणाले की, ज्या विनोबा भावे यांनी भूदान चळवळ उभारून भूमिहिनांना, शेतकर्‍यांना व गोरगरिबांना जमिनी मिळवून दिल्या. आज 70 वर्षांनंतर त्याच गागोदे गावाजवळ बाळगंगा धरणाचा सिंचन घोटाळा घडतो व अनेक शेतकर्‍यांना त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित राहावे लागते. हाच पैसा जर सिंचनात खरोखरंच लागू केला असता, तर येथील शेती ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला असता, परंतु सुनील तटकरे यांनी या जलसिंचनात भ्रष्टाचार केला. शेतकरी कुटुंबांचे शाप त्यांना लागतील.

आपल्या आक्रमक भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, जिल्ह्यात बाळगंगा आणि कोंढाणा धरणाचे घोटाळे झाले. येथील लोकांच्या समस्या मात्र वार्‍यावर सोडण्यात आल्या. अशा या भ्रष्टाचारी सुनील तटकरेंना आपण आपले मत देणार का? ते पुढे म्हणाले, येथील आमदार धैर्यशील पाटीलही तटकरेंसाठी मत मागत आहे. त्यांच्यावर ही वेळ आली याचे कारण असंगताशी संगत व प्राणाशी गाठ आहे. ते बुडाले, आता आपणही बुडणार अशी परिस्थिती यांच्या आघाडीची सध्या झालेली आहे. येथील बाळगंगा धरण बांधण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे. जनतेला योग्य न्याय मिळेपर्यंत आम्ही सतत काम करीत राहू. आमच्यावर विश्वास ठेवा. आपले सर्व प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडूव. सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनाच तुम्ही विजयी करा.

माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी म्हटले की, निष्काम, भ्रष्टाचारी सुनील तटकरेंना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. त्यांचे सध्याचे साथीदार शेकापचे जयंत पाटील पालकमंत्र्यांवर टीका करतात, मात्र याच पालकमंत्र्यांचे पाय धरायला ते वारंवार कशाला जातात हे त्यांनी स्पष्ट करावे. येथील जनतेला खरोखरंच न्याय मिळाला पाहिजे. माधव भंडारी व प्रशांत ठाकूर येथील जनतेला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. येथील जनतेच्या विकासासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सरकार आमचे आहे. तुमच्या बापाचे नाही. तुम्ही तुमच्या कार्यकाळात काय विकासकामे केली हे दाखवा, असे आव्हानही पाटील यांनी विरोधकांना दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, जि. प. चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, गागोदेचे सरपंच शिवाजी पाटील, बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली.

राष्ट्रवादी-शेकाप लोण्यासाठी एकत्र : आमदार प्रशांत ठाकूर

ज्यांनी 13 वर्षे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपभोगले त्यांनीच सर्वसामान्य जनतेच्या जमिनीमध्ये भ्रष्टाचार केला. असे हे भ्रष्टाचारी नेते आता मतांचा जोगवा मागू लागले आहेत. त्यांना पूर्वी विरोधात असणार्‍या शेतकरी कामगार पक्षाने मिठी मारली आहे. आपण दोघे भाऊ भाऊ, सर्व लोणी वाटून खाऊ अशी परिस्थिती दोघांची झाली आहे, मात्र आपल्याला त्यांचे आव्हान मोडीत काढायचे आहे, अशा शब्दांत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. अनंत गीतेंना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

Check Also

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद

रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील सर्वांत जुने असलेले धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद …

Leave a Reply

Whatsapp