Monday , October 14 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / चुकीच्या नेतृत्वामुळे रायगड काँग्रेसची वाताहत

चुकीच्या नेतृत्वामुळे रायगड काँग्रेसची वाताहत

पेण : अनिस मनियार

बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष वाढविण्याचे काम मी केले. जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आणले. जिल्हा अध्यक्ष असताना 2004 साली खासदार व दोन आमदार निवडून आणले. इतकी खडतर मेहनत घेऊन काँग्रेस उभी केली. आताचे अध्यक्ष काँग्रेस सोडतात व परत येतात आणि माझ्यासारख्या स्वच्छ माणसावर शिंतोडे उडवतात. यांची बोलण्याची लायकी नाही. हे काँग्रेसचे पदाधिकारी झाल्यापासून पक्षाचे वाटोळे झाले व उरलीसुरली संघटनाही साफ होण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत माजी मंत्री आणि भाजप नेते रविशेठ पाटील यांनी कुचकामी नेतृत्वावर निशाणा साधला. ते लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ‘रामप्रहर’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आपली भूमिका स्पष्ट करताना रविशेठ पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी सर्व मतदारांना सांगू इच्छितो की, पेण तालुुक्यात, मतदारसंघात व जिल्ह्यात विकासकामे होण्याच्या द़ृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झालो. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी निरपेक्ष काम करून महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून आणू या. मला विधानसभा निवडणुकीत मिळालेली 62 हजार मते गीतेंच्या पाठीशी आजही ठामपणे असून, ते 100 टक्के निवडून येणार यात शंका नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शेकाप हे पक्ष जरी एकत्र आले व मोठ्या फुशारक्या मारत असले तरी शेकाप कार्यकर्त्यांच्या मनात तटकरेंना मत द्यावे असे वाटत नाही. साप आणि मुंगुसाची जशी दोस्ती असते तशी यांची आघाडी आहे. याचे उदाहरण तुम्हाला द्यायचे झाले, तर रोह्यात गेल्या लोकसभेला जयंत पाटील हे सुनील तटकरेंवर किती आगपाखड करीत होते. तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही हजर होते. आता त्यांचे किती दिवस एकमेकांबरोबर पटते ते आपण बघू या.

पेण विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मागील निवडणुकीत मला 62 हजार मते पडली. शिवसेनेच्या उमेदवाराला 44 हजार मते व भाजप उमेदवाराला 10 हजार मते पडली. त्यांची बेरीज केली तर एकूण संख्या होते 1 लाख 25 हजार. दुसरीकडे शेकाप 64 हजार व राष्ट्रवादीची 10 हजार अशी एकूण 74 हजार मते होतात. मग कुठल्या गणितात हे दावा करतात की आघाडीचा विजय होईल. ते कदापि शक्य नाही. या मतदारसंघातून अनंत गीते 40 ते 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील यात शंका नाही. पेण मतदारसंघात मी जितकी विकासकामे केली आहेत तेवढीच आहेत. शेकापच्या आमदाराची कामे शून्य आहेत. त्यामुळे उद्या येणारे सरकार हे भाजप-शिवसेनेचेच येणार. केंद्रासह राज्यातही भाजप युतीचे सरकार येणार, तसेच जी विकासकामे होतील उदाहरणार्थ खारजमीन, खारबंदिस्ती, रस्ते, भातशेती ही सर्व कामे अनंत गीते यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि या मतदारसंघाला व जिल्ह्याला विकासात झुकते माप देऊ, अशी ग्वाही शेवटी रविशेठ पाटील यांनी दिली.

Check Also

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्था-संघटनांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट …

Leave a Reply

Whatsapp