Friday , June 25 2021
Breaking News

टी-20 विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान बीसीसीआयला विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली, परंतु देशातील कोरोनाची स्थिती अद्यापही गंभीर असून ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वचषक भारताबाहेर खेळवण्याबाबत बीसीसीआयचा अंतिम निर्णय जवळपास झाला असून लवकरच ते आयसीसीला याविषयी अधिकृतरित्या कळवतील, असे समजते.
‘विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयने आयसीसीकडे मुदत वाढवून मागितली होती, परंतु आता 28 जूनपर्यंत थांबण्यापेक्षा त्यापूर्वीच बीसीसीआय आयसीसीला विश्वचषक भारताबाहेर खेळवण्याबाबत कळवण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती पाहता आयोजनाची सूत्रे भारताकडेच राहतील, पण स्पर्धा अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येईल,’ असे बीसीसीआयच्या पदाधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
अमिराती येथील अबूधाबी, दुबई आणि शारजा येथे सामने खेळवण्याबरोबरच ओमानची राजधानी मस्कत येथेही विश्वचषकाच्या काही लढती खेळवण्याबाबत आयसीसी विचार करीत आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14व्या हंगामातील उर्वरित लढतीसुद्धा अमिरातीत रंगणार आहेत. त्यामुळे विदेशी खेळाडू भारताच्या तुलनेत अमिरातीला प्राधान्य देऊन विश्वचषकासाठी येतील, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
विश्वचषकात सहभागी होणार्‍या 16 संघांपैकी एकाही संघातील खेळाडूला स्पर्धेदरम्यान कोरोनाची लागण झाल्यास संपूर्ण स्पर्धा रद्द करावी लागू शकते. त्यामुळे बीसीसीआय आणि आयसीसी भारतात विश्वचषकाचे आयोजन करण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय अमिरातीत विमान प्रवास टाळता येणे शक्य असून तेथील कोरोनाची स्थिती भारताच्या तुलनेत उत्तम असल्यामुळे विश्वचषक भारताबाहेर खेळवणेच योग्य ठरेल.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp