Friday , June 25 2021
Breaking News

फ्रेंच ओपन : जोकोव्हिच, नदाल विजयी

पॅरिस ः वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी राफेल नदाल यांनी विजयी घोडदौड कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. गतविजेती इगा श्वीऑनटेक, अमेरिकेची सोफिया केनिन तसेच अमेरिकेची स्लोएन स्टीफन्स आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनीही पुढील फेरीतील स्थान निश्चित केले.
अग्रमानांकित जोकोव्हिचने तिसर्‍या फेरीत रिकार्ड बेराकिन्सचा 6-1, 6-4, 6-1 असा तीन सेटमध्ये सहज धुव्वा उडवला. एक तास आणि 32 मिनिटांत हा सामना जिंकणार्‍या जोकोव्हिचने कारकीर्दीत एकूण 15व्यांदा फ्रेंच स्पर्धेची चौथी फेरी गाठली. आता सोमवारी होणार्‍या लढतीत त्याच्यासमोर इटलीच्या लॉरेंझो मसेटीचे आव्हान असेल.
21व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या स्पेनच्या नदालने ब्रिटनच्या कॅमेरून नोरी याच्यावर 6-3, 6-3, 6-3 अशी सरशी साधली. नदालला चौथ्या फेरीत इटलीच्या यानिक सिन्नरचा सामना करावा लागेल. पाचव्या मानांकित त्सित्सिपासने 31व्या मानांकित जॉन इस्नरचा 5-7, 6-3, 7-6 (7-3), 6-1 असा पराभव केला. पुढील फेरीत त्सित्सिपासची स्पेनच्या 12व्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टाशी गाठ पडेल. बुस्टाने स्टीव्ह जॉन्सनला 6-4, 6-4, 6-2 अशी धूळ चारली. अर्जेंटिनाच्या 10व्या मानांकित दिएगो श्वाट्र्झमनने फिलिप कोलस्क्रीबरवर 6-4, 6-2, 6-1 असे वर्चस्व गाजवले. श्वॉट्र्झमनचा पुढील फेरीत जॅन स्टर्फशी सामना होईल.
महिला एकेरीत पोलंडच्या आठव्या मानांकित श्वीऑनटेकने इस्टोनियाच्या अ‍ॅना कोन्टाविट हिचे आव्हान 7-6 (4), 6-0 असे परतवून लावले. 20 वर्षीय श्वीऑनटेकसमोर चौथ्या फेरीत युक्रेनच्या मार्ता कोस्तूकचे आव्हान असेल. चौथ्या मानांकित केनिनने अमेरिकेच्या जेसिका पेगुलावर 4-6, 6-1, 6-4 अशी मात केली. स्लोएन स्टीफन्सने कॅरोलिना मुचोव्हाला 6-3, 7-5 असे पराभूत केले. पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिनाचे आव्हान मात्र संपुष्टात आले. बार्बोरा क्रेझिकोव्हाने स्वितोलिनाला 6-3, 6-2 असे सहज नमवले. स्वितोलिनाच्या पराभवामुळे आता फक्त केनिन ही पहिल्या पाच अग्रमानांकित खेळाडूंमधील एकमेव टेनिसपटू स्पर्धेत टिकून आहे. नाओमी ओसाका, अ‍ॅश्ले बार्टी, आर्यना साबालेंका यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
अमेरिकेच्या 23व्या मानांकित कोको गॉफ हिने आपल्याच देशाच्या जेनिफर ब्रॅडी हिच्याविरुद्ध 6-1, 0-0 अशा स्थितीत विजय मिळवला. ब्रॅडीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने गॉफला चौथ्या फेरीत प्रवेश मिळवता आला.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp