Friday , June 25 2021
Breaking News

माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपमध्ये

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यूपीए-2च्या काळात केंद्रात मंत्रिपदी राहिलेले यूपीतील वरिष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी बुधवारी (दि. 9) भाजपचा झेंडा हाती घेतला.
जितीन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेता भाजपमध्ये आल्याने आता काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 2019मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची मागणी करणार्‍या जी-23 गटापैकी जितीन प्रसाद एक आहेत.
देशासाठी जर कुणी ठामपणे उभे आहेत तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशी सूचक प्रतिक्रिया जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना दिली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी थेट काँग्रेस नेतृत्व आणि काँग्रेसमधील कार्यपद्धतीवरच निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp