Friday , June 25 2021
Breaking News

थोडीतरी जाणीव ठेवा

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे आदरणीय नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांमध्ये जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, डोंबिवली आदी विविध ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी, आगरी-कोळी बांधवांनी गुरुवारी मानवी साखळी आंदोलन केले. नियोजित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळवून देण्यासाठी एक लोकचळवळच उभी राहिली आहे. सत्तेचे आणि मतांचे राजकारण बाजूला ठेवून राज्यातील सत्ताधार्‍यांनी या विषयाकडे बघायला हवे होेते. दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही.  काही दशकांपूर्वी उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदराचे नियोजन होत होते, तेव्हाही या अत्याधुनिक बंदराला कोणाचे नाव द्यायचे यावर बराच वादंग माजला होता. त्या वेळी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उरणचा आणि नेहरूंचा संबंध काय असा रोखठोक सवाल केला होता. तरीही अर्थात बंदराचे नाव जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हेच भविष्यात अमर झाले. इतिहासाने पुन्हा एकदा वर्तुळाकार फिरून आपल्याला तेथेच आणून उभे केले आहे. कदाचित तेव्हा केलेली चूक सुधारण्याची ही संधी असावी, परंतु राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने स्थानिक जनमानसाच्या मागणीला अक्षरश: पाने पुसली असून नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने ओळखला जायला हवे अशी भूमिका घेतली आहे. स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे रायगड जिल्ह्यात अन्यत्र स्मारक व्हावे अशी मखलाशीही शिवसेना नेत्यांतर्फे केली जातेय, परंतु जिल्ह्यातील भूमिपुत्रांना शिवसेनेच्या या भूमिकेचा मनस्वी संताप आला आहे. किंबहुना, दि. बा. पाटील यांचे नाव संपूर्ण रायगड, ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या अस्तित्वाशी कायमस्वरुपी जोडलेले आहे. कुठल्याही पक्षाच्या बाजूने उभे राहण्याचा विचार त्यांच्या मनात नाही. लोक उभे आहेत ते ‘दिबां’च्या नावाच्या पाठीशी आणि त्या संदर्भात त्यांच्या मनात अन्य कुठलाही पर्याय डोकावूही शकत नाही. दि. बा. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे मातब्बर नेते होते. विधानसभा व लोकसभेतील आपली कारकीर्द त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणांनी गाजवली. सिडकोची स्थापना झाल्यानंतर भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी ते पुढे सरसावले. न्हावा शेवा बंदराची उभारणी करण्यात आली तेव्हाही त्यांच्याच नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळाला. त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यात उभ्या राहणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले जावे ही मागणी आजची नाही. सन 2012पासून जसजसे या प्रकल्पाचे काम आकार घेऊ लागले, तेव्हापासून आगरी-कोळी समाजासह येथील स्थानिकांची ही मागणी आहे. भाजपसहित इतर अनेक पक्षांची माणसे या मागणीच्या पाठीशी आहेत. मुंबईत जसा बाळासाहेबांमुळे मराठी माणूस टिकला आहे, तसा ‘दिबां’च्या कार्यामुळे इथला भूमिपुत्र जगला आहे, ही स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलेली भावना येथील प्रत्येकाच्या मनात आहे. ‘दिबां’चेच नाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले गेले पाहिजे ही आग्रही मागणी त्या भावनेतूनच पुढे येते आहे. नावात काय आहे असा प्रश्न विख्यात नाटककार विल्यम शेक्सपियरने विचारला होता, परंतु हाच प्रश्न कुठल्याही रायगडवासी भूमिपुत्राला विचारला तर तो सांगेल की ‘दिबां’च्या नावातच आमचे अस्तित्व सामावलेले आहे.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp