Friday , June 25 2021
Breaking News

रायगडमधील कोरोना रुग्णवाढीला जबाबदार कोण?

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर सध्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 1 ते 6 जून या आठवड्यात जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर सध्या 13.14 टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 36 हजार 69 जणांना कोरोनाची बाधा झाली. एक लाख 26 हजार 416 जण बरे झाले. तीन हजार 267 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच कोरोनामुळे मृत्यूदर 2.40 इतका आहे. शेजारच्या ठाणे व मुंबईमध्ये कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यात मात्र हे प्रमाण कमी होत नाही ही चिंतेची बाब आहे. याला प्रशासन व नागरिक दोन्ही जबाबदार आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या सहा हजार 676 उपचाराधिन रुग्ण आहेत. अलिबागमधील एक हजार 172, पनवेल मनपा हद्दीतील एक हजार 198, पनवेल ग्रामीणमधील 679, उरण 283, खालापूर 305, कर्जत 150, पेण 642, मुरूड 249, माणगाव 280, तळा 75, रोहा 765, सुधागड 83, श्रीवर्धन 164, म्हसळा 59, महाड 219, पोलादपूर 63 अशी रुग्णांची संख्या आहे. अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड, मुरूड येथील रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. पनवेल मनपा आणि पनवेल ग्रामीणमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी उर्वरित रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. काही तालुक्यांत पुन्हा एकदा रुग्णवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 1 ते 6 जून या आठवड्यात रुग्णवाढीचा दर हा 13.14 टक्के होता. याआधीच्या आठवड्यात रुग्णवाढीचा दर 18 टक्क्यांवर होता. जरी टक्केवारी कमी होत असली तरी मृत्यूदरदेखील 2.40 इतका आहे. राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्याच्या तुलनेत हा दर अधिक आहे.वयोमानानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेतले, तर 31 ते 40 वयोगटात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर मृत्यूदर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सगळ्यात जास्त आहे. जिल्ह्यात 61 वर्षांवरील 16 हजार 601 जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील दोन हजार 227 जणांचा मृत्यू झाला. या वयोगटातील मृत्यूदर 13.41 टक्के एवढा आहे. 51 ते 60 वयोगटातील 17 हजार 567 जणांना कोरोनाची लागण झाली. यातील 512 जणांचा मृत्यू झाला. या वयोगटातील मृत्यूदर 2.91 टक्के आहे. 41 ते 50 वयोगटात 22 हजार 602 जण कोरोनामुळे बाधित झाले. त्यातील 255 जणांचा मृत्यू झाला. या वयोगटातील मृत्यूदर 1.13 टक्के आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण हे 31 ते 40 वयोगटात आहे. या वयोगटातील 34 हजार 620 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 117 जणांचा मृत्यू झाला. या वयोगटातील मृत्यूदर 0.34 टक्के इतका आहे. 21 ते 31 वयोगटातील 26 हजार 95 जण कोरोनामुळे बाधित झाले. त्यातील 31 जणांचा मृत्यू झाला. या वयोगटातील मृत्यूदर 0.12 टक्के आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची फारशी लागण झाली नव्हती, मात्र दुसर्‍या लाटेत 0 ते 20 वयोगटातील अनेल मुले कोरोनाबाधित झाली. जिल्ह्यात 11 ते 20 वयोगटातील नऊ हजार 184 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या वयोगटातील मृत्यूदर 0.10 टक्के एवढा आहे. 0 ते 10 वयोगटातील पाच हजार 165 जणांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वयोगटातील मृत्यूदर 0.06 टक्के एवढा आहे. हे आकडे जिल्ह्याची परिस्थिती काय आहे हे दर्शवितात. टाळेबंदी उठवल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी काही बाबींकडे दुर्लक्ष केले. लग्नसमारंभांत होणारी गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. आंतरजिल्हा वाहतुकीवर निर्बंध असताना जलप्रवासी वाहतूक निर्धोक सुरू होती. ग्रामीण भागात आवश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरूच होती. बाजारपेठांमधील गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झालेच नाहीत. विनाकारण फिरणार्‍यांवर कठोर कारवाईकडे यंत्रणांनी दुर्लक्ष केले. कामगार नाक्यांवरील गर्दी रोखण्याचाही प्रयत्न झाला नाही. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला गेला नाही. कोरोनाबाधितांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यावर भर दिला गेला. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुर्लक्ष केले. जनतेनेदेखील कोरोनाचे नियम पाळले नाहीत.  रायगड जिल्ह्यातील या परिस्थितीला प्रशासन व जनता दोघेही जबाबदार आहेत. जिल्ह्यात लसीकरणही संथगतीने सुरू आहे. पाच लाख 18 हजार 973 लोकांनी लसीकरण केले आहे. हे प्रमाण फारच कमी आहे. आजही लोक लसीकरण करण्यास घाबरतात. आदिवासी तसेच अल्पसंख्याक समाजात लसीबाबत गैरसमज आहेत. ते दूर करावे लागतील. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन काम करावे लागेल.  आतापर्यंत जे लसीकण झाले, त्यात महिलांची संख्या खूपच कमी आहे. लस घेणार्‍यांत महिलांचे प्रमाण 30 टक्के आहे. हे प्रमाण वाढवावे लागेल. कोरोना रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी लसीकरण वेगात करावे लागेल. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर देणे, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे, तसेच संस्थात्मक विलगीकरण करून रुग्णांवर उपचार करावे लागतील. कोरोना चाचण्यांचे प्रमाण आणि कॉन्टॅक्ट ट्रेंसिग वाढविणे या दोन पातळ्यांवर आपल्याला काम करावे लागेल. राज्याची टाळेबंदीमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. साप्ताहिक कोरोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची संख्या लक्षात घेऊन पाच स्तरांत निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. यात रायगड जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. रायगडमधील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन व जनता दोघांनाही जबाबदारीने वागावे लागेल.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp