Sunday , July 25 2021
Breaking News

नवी मुंबई झाली भूमिपुत्रमय!

नवी मुंबई : प्रतिनिधी

अखेर तो दिवस उजाडला…..म्हणत रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी पहाटेपासूनच नवी मुंबईकडे धाव घेतली. बघता बघता नवी मुंबईतील रस्ते ही प्रकल्पग्रस्तमय झाले. म्हणे आम्हाला आमच्या बापाचे नाव विमानतळाला मिळावे या मागणीसाठी आज आम्हाला एकजुट दाखवावी लागली. आंदोलन व वटपौर्णिमादेखील योगायोगाने एकाच दिवशी आल्याने प्रकल्पग्रस्त महिला भगिनींनी आजची वटपौर्णिमा आंदोलनस्थळी साजरी करून ‘दिबां’च्या नावासाठी प्रार्थना केली, तर तुर्भे गावातील सुगंधा शरद पाटील यांनी व त्यांच्या नाते संबंधातील महिलांनी सकाळी सहा वाजताच वटपौर्णिमा साजरी केली. आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे असल्याने अनेक महिलांनी मुहूर्ताच्या आधीच वडाची पूजा उरकून घेतली, तर बोनकोडे गावातील बाईबाई म्हात्रे यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनी  देखील आंदोलनस्थळी वटपूजन केले. बाईबाई नामदेव म्हात्रे यांनी तर आंदोलनासाठी स्पेशल शॉर्ट फिल्म तयार केली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद दिवसेंदिवस तापत चालला आहे. विमानतळाला नाव देण्यासाठी वेगवेगळ्या नावांची मागणी करण्यात आली असून, विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, यासाठी स्थानिक भूमिपूत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि आपली  एकजुटीची ताकद राज्य सरकार व सिडकोला दाखवून दिली. आंदोलनामध्ये आगरी कोळी, कराडी, भंडारी, कातकरी, आदिवासी तसेच बहुजन समाजही मोठ्या संख्येने सामील झाला होता. बुधवारी रात्रीपासूनच अनेकांनी आंदोलनाची सर्व तयारी उरकून घेतली होती. पहाटेपर्यंत सोशल मीडियावर आजच्या आंदोलनाची चर्चा व त्याच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत होत्या. प्रत्येक प्रकल्पग्रस्त गुरुवारच्या सकाळची वाट पाहत जागाच राहिला. बापाच्या नावासाठी एक दिवस झोप नाही मिळाली तर काही होत नाही. अनेकांनी दोन दिवस आधीच सुटी मिळावी म्हणून रजा टाकल्या होत्या. गुरुवार उजडताच प्रत्येकाची पावले आपसूकच सिडको भवनाकडे वळली.  बघता बघता ठाणे बेलापूर मार्ग, सायन पनवेल मार्ग वाहनांच्या गर्दीने भरून लागला, मात्र पोलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली नाही. मात्र रस्त्यावरून ये जा करणारी वाहने स्वतःहून थांबून आंदोलकांकडून ‘दिबां’बाबत माहिती जाणून घेत होते. त्यानंतर ‘दिबां’चे नाव योग्य असल्याचा कौल देऊन पुढच्या प्रवासाला निघत होते. काही स्वतःहून आपली वाहने पार्किंगमध्ये लावून आंदोलनात सामील झाले. विशेष म्हणजे त्यातील काहीजण हे बिगर महाराष्ट्रीयनदेखील होते. पोलिसांनी आंदोलनात सहभागी न होण्यासाठी ज्यांना ज्यांना नोटीसा दिल्या होत्या तेही न घाबरता सहभागी झाले होते, तर काहींनी पारंपरिक वेशभूषा करत विमानतळाला नाव ‘दिबां’चे असे फलक हाती घेऊन घोषणा देत आंदोलनात सामील झाले. ज्यांना आंदोलनात सामील होता आले नाही त्यांनी घरातच देव पाण्यात ठेवून एकविरा आईला साकडे घालून आंदोलनाची हवा केंद्रात पोहचली जावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या ऐतिहासिक आंदोलनाची क्षणचित्रे व लाईव्ह आंदोलन बघून राज्य शासनाच्या नाकर्ते कारभाराचा घरबसल्या विरोध केला. आज नाही तर कधीच नाही, असे घरातच घोषणा देत ठाकरे सरकारचा निषेध केला.गावागावातील वातावरण हे एकप्रकारे आंदोलनाचे झाले होते. आंदोलनात अपंग, वयोवृद्ध व लहान मुलेदेखील हातात ‘दिबां’च्या नावाचे फलक घेऊन मोठ्या उत्साहाने सामील झाली होती. ‘दिबां’ची तिसरी पिढीदेखील आंदोलनात उतरली होती.

Check Also

मॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य

पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …

Leave a Reply

Whatsapp