Saturday , October 16 2021
Breaking News

जनतेसाठी भाजप सदैव कार्यरत; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नवी मुंबई ः प्रतिनिधी
मी कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे घरी न थांबता जनतेत मिसळतो. सामान्य जनतेची कामे करतो. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत. त्यामुळे आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 12) नवी मुंबईत बोलताना केले. बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील गरीब, गरजू रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका आणि एपीएमसीतील व्यापारी-माथाडी यांच्याकरिता टाकाऊमधून टिकाऊ तयार करण्यात आलेली सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृह बस यांचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. बेलापूर पामबीचजवळ एनआरआय सर्व्हिस रोड येथे आयोजित या सोहळ्याच्या व्यासपीठावर माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक, आमदार रमेश पाटील, माजी आमदार व माथाडींचे नेते नरेंद्र पाटील, भाजप नवी मुंबई जिल्ह्याध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार आदी उपस्थित होते. दिवाळे गावातील मासेविक्रेत्या 80 महिलांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने व्यवसाय परवाने प्राप्त झाले. त्यापैकी मासेविके्रत्या पाच भगिनींना या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात परवाने वाटप करण्यात आले. आपल्या भाषणात फडणवीस यांनी गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील नागरिकांना उत्तम व चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी मी अहोरात्र काम करीत आहे. कोट्यवधी रुपयांची विकासकामे आपण केली आहेत. आज रुग्णवाहिका आणि प्रसाधनगृह बस सुविधा लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. या सोहळ्यास नवी मुंबई महामंत्री निलेश म्हात्रे, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा नवी मुंबई अध्यक्ष भास्कर यमगर, युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, दिलीप आमले, सुहासिनी नायडू, माजी नगरसेवक सुरज पाटील, दीपक पवार, गणेश म्हात्रे, संपत शेवाळे, रवींद्र इथापे, माजी नगरसेवक नेत्रा शिर्के, स्वाती गुरखे, नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, एपीएमसी संचालक शंकरशेठ पिंगळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बेलापूर किल्ले गावठाण येथील श्री गोवर्धनी मातेचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे सीवूडस्मधील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले.

नवी मुंबईतील जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल!
नवी मुंबईत माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक असतील आमदार मंदाताई म्हात्रे असतील यांच्या माध्यमातून विकास झाला. देशातील सर्वांत स्वच्छ म्हणून हे शहर नेहमी अग्रेसर राहिले आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल. नवी मुंबईची सेवा करण्याकरिता आमच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये मंचावरील मंडळी कायम तयार असतील, असा विश्वास या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp