Saturday , October 16 2021
Breaking News

शिवसेना आमदारावर टीका करीत शेकापचा अलिबागेत ‘रास्ता रोको’

अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग-रोहा रस्त्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी शेकाप पुरोगामी युवक संघटनेने बुधवारी (दि. 13) खानाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्र्रस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडीला ज्या इतर काही पक्षांचा पाठिंबा आहे त्यात शेतकरी कामगार पक्षाचाही समावेश आहे. आघाडी सरकारला दीड वर्ष होऊन गेले तरी त्यांच्यातील धुसफूस सुरूच असल्याचे अधूनमधून दिसून येते. प्रसंगी या पक्षांमध्ये वादावादीही होत असते. आता शेकापने शिवसेना आमदाराला लक्ष्य करून आंदोलन केले. याच आमदार महेंद्र दळवी यांनी शेकाप उमेदवाराचा गत विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव केला होता. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग-रोहा रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अडीच वर्षे होऊनही काम अपूर्णच आहे, असे सांगत बुधवारी शेकापतर्फे रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, जि. प.चे माजी सदस्य संजय पाटील, संदीप घरत, अनिल पाटील, नगरसेवक, सरपंच, सदस्य यांच्यासह शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी बोलताना शेकापचे सहचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार महेंद्र दळवींवर टीका केली. शिवसेना आमदार हे निवडून आल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून स्वखर्चाने रस्त्याचे काम सुरू करणार होते, मात्र अडीच वर्षे झाले तरी हा रस्ता ठेकेदारांकडे टक्केवारी मागणी केल्याने रखडला, असा आरोप त्यांनी केला. आता शेकापच्या या आंदोलनावर आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर आमदार दळवी काय उत्तर देतात याकडे अलिबागकरांचे लक्ष लागले आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp