Saturday , October 16 2021
Breaking News

अतिवृष्टीबाधितांसाठी अखेर मदत जाहीर; भाजपच्या सातत्यपूर्ण मागणीला यश

मुंबई ः प्रतिनिधी
भाजपने सातत्याने लावून धरलेल्या मागणीमुळे राज्यातील पूरग्रस्त, तसेच अतिवृष्टीबाधितांसाठी अखेर ठाकरे सरकारने मदत जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 13) झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार अतिवृष्टीबाधित आणि पूरग्रस्तांना 10 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या काळात आलेल्या पुरामुळे, तसेच अतिवृष्टीमुळे 55 लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकरी, तसेच अन्य बाधित घटकांना राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत तातडीने देण्याची मागणी केली होती. शेतकर्‍यांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी म्हटले होते. अखेर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्यांना सरकारी मदत जाहीर करण्यात आली आहे. जिरायतीसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये, बागायतीसाठी प्रति हेक्टर 15 हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
ड्रग्जविरोधात केंद्राची योजना : राज्यात ड्रग्जचा सुळसुळाट झाला आहे. या पार्श्वभूमीवर मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही योजना 2023पर्यंत राबविण्यात येणार असून योजनेच्या 13 कोटी 70 लाख रुपये खर्चासही या वेळी मंजुरी देण्यात आली.

फडणवीस यांनी लावून धरला होता मुद्दा

यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर येऊन नुकसान झाले. त्यात कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काही ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडल्या. यात जीवित तसेच वित्त हानी झाली. अतिवृष्टीचा फटका शेतकर्‍यांनाही बसला. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके मुसळधार पावसात अक्षरश: वाहून गेली. या सर्व घटकांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरली होती.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp