Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / खारघरमध्ये महाआघाडीचा फ्लॉप शो; शरद पवारांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांची गर्दी

खारघरमध्ये महाआघाडीचा फ्लॉप शो; शरद पवारांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांची गर्दी

खारघर : प्रतिनिधी

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची कामोठ्यातील सभा मंगळवारी (दि. 23) जोरदार झाली असताना, त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ यांच्यासाठी घेतलेली सभा अक्षरशः फ्लॉप ठरली. या सभेत रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे महाआघाडीत एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांची सभा खारघर सेक्टर 15 येथील घरकुलनजीकच्या मैदानात झाली. या मैदानाच्या काही भागात कापडी कुंपण घालून आधीच जागा कमी करण्यात आली होती, मात्र तेथे असलेल्या अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अगदी पवारांचे भाषण सुरू झाले असतानाही भाड्याने लोक आणण्याची धावपळ सुरू होती. तरीही मागील खुर्च्या रिकाम्याच होत्या.

कामोठ्यातील महायुतीच्या सभेवेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. नालंदा बौद्धविहार मैदानातील सभास्थानी असलेल्या सर्व खुर्च्या कार्यकर्त्यांनी भरल्या गेल्या होत्या; तर बसायला जागा न मिळाल्याने काही कार्यकर्ते उभे होते. दुसरीकडे, खुर्च्या असूनही कार्यकर्त्यांची कमी शरद पवारांच्या उपस्थितीत खारघरमध्ये झालेल्या महाआघाडीच्या सभेत पाहावयास मिळाली. त्यामुळे मावळ मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे.

माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार आणि त्यानंतर मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांची जाहीर झालेली उमेदवारी पाहाता पवार कुटुंबात आलबेल नव्हते. त्यातच आता महाआघाडीतही बेबनाव असल्याचे खारघरच्या सभेवरून दिसून येते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शरद पवारांनी महाआघाडीतील स्थानिक नेत्यांना झापल्याचे वृत्त आहे.

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp