Wednesday , October 28 2020

‘एक ही भूल’

‘एक ही भूल’ हा  ए. पूर्णचंद्र राव यांच्या लक्ष्मी प्रोडक्शन्सचा 1981मध्ये जितेंद्र आणि रेखा यांची भूमिका असलेला चित्रपट त्यावेळी खूप चालला होता. त्यामध्ये राम (जितेंद्र) आणि साधना (रेखा) एक श्रीमंत विवाहित जोडपे आहेत. राम एक पदवीधर असून बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी  असतो. त्याच्या हातून नशेत एक चूक घडते. त्यामुळे साधना त्याला क्षमा न करता घटस्फोट घेते. त्यावेळी ती प्रेग्नंट असते. ती मुलाला जन्म देते आणि चित्रपटात शेवटी हा मुलगा या दोघांना एकत्र आणतो. साधना त्याला क्षमा करते असे दाखवले आहे.

या चित्रपटात रामला अखेर साधना क्षमा करते, पण सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. राज्यातील 17 मतदारसंघांत हे मतदान होत आहे. या वेळी आपण मतदान न केल्यास आपल्या या ‘एक ही भूल’ला देशातील लोकशाही क्षमा करणार नाही. सलग सुट्या असल्याने बाहेरगावी पिकनिकला न जाता लोकशाही बळकट करण्यासाठी या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी होऊन कोणत्याही दबावाला किवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणे गरजेचे आहे. आपल्या मावळ मतदारसंघातही मतदान होणार असल्याने आपण ’एक ही भूल’ न करता लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे भवितव्य बदलणार आहे. आपल्या देशाची प्रगती, सुरक्षितता आणि देशाला जागतिक पातळीवर मिळणारा मानसन्मान या सगळ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. कल्याण-अलिबाग गाडीत नवरा बायको आपल्या अडीच वर्षांच्या मुलालाच विसरून गेले. पेणला गाडीत मुलगा एका महिलेच्या बाजूला झोपलेला होता. त्याला तिकीट नसल्याने वाहकाने त्या महिलेला त्याच्या तिकिटाचे विचारण्याचा प्रश्नच आला नाही. ती महिला कार्ले खिंडीत उतरताना त्याने मुलगा झोपला आहे त्याला नीट घ्या, म्हटल्यावर तिने हा आपला मुलगा नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्या आईचा शोध सुरू झाला. गाडीत त्याचे आईवडील नसल्याने अखेर त्याला अलिबागला वाहतूक नियंत्रकाकडे नेण्यात आले. छान गोंडस, तरतरीत मुलगा पण त्याला काही माहिती सांगता येत नव्हती. त्याचे काय करायचे हा प्रश्न सगळ्यांना पडला. आपली ड्यूटी संपवून घरी निघालेल्या महिला वाहक रिना इंदुलकर यांना थांबवून त्याला सांभाळण्यास सांगण्यात आले. त्याचे आईवडील मुलगा सापडत नाही म्हटल्यावर पेण पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार करून आले. त्याच वेळी एक मुलगा अलिबागला गाडीत सापडल्याची माहिती पेण एसटी कंट्रोल पॉइंटला मिळाली.

त्याचा फोटो पेणला मागवण्यात आला. महिला वाहक रिना इंदुलकर यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर त्याचा  फोटो पाठवला. आपलाच  मुलगा असल्याची खात्री झाल्यावर आईवडील आणि पोलीस  अलिबागला गाडी करून निघाले. तोपर्यंत वाहक रिना इंदुलकर यांनी तो मुलगा काहीच स्पष्ट बोलत नसला तरी शांतही बसत नसल्याने त्या मुलाला चॉकलेट दे, बिस्कीट दे करीत खेळत ठेवले. या गडबडीत अडीच-तीन तास गेले. आईवडील तिथे येताच मुलगा धावत आईजवळ गेला. तिच्याही डोळ्यांत आनंदाने पाणी आले. मायलेकाचे मीलन पाहून सगळ्यांना गहिवरून आले. त्या गडबडीत मुलाला सांभाळणार्‍या वाहक रिना इंदुलकर यांचा सगळ्यांनाच विसर पडला असेल, पण या वेळी उपस्थित प्रवाशांनी मुलाच्या आईवडिलांना खूप सुनावले. त्यांच्या ’एक ही भूल’बद्दल त्यांना खूप ऐकावे लागले, पण शेवट गोड झाला.

पण तुम्ही मतदान न करण्याची भूल केलीत, तर तुम्ही केलेल्या या

’एक ही भूल’बद्दल तुम्हाला कोणाचे ऐकावे लागणार नाही, पण लोकसभेच्या या निवडणुकीनंतर केंद्रात निवडून येणार्‍या शासनाच्या कामाचा, त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांचा आणि केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय धोरणांचा चांगला-वाईट परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या प्रगतीवर होणार्‍या परिणामाला आणि मायभूमीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार तुमची ’एक ही भूल’ असेल हे लक्षात ठेवा. तिचा शेवट

चित्रपटाप्रमाणे किंवा त्या छोट्या मुलाच्या प्रसंगाप्रमाणे  गोड होणार नाही. आपल्याला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात आली आहे. खासगी कंपन्यांनीही सवलत दिली आहे. मतदान न केल्यास त्या दिवसाचा पगार कापला जाणार आहे हे लक्षात ठेवा. शनिवार -रविवारच्या सुटीला लागून सोमवारी मतदानाची सुटी असल्याने मतदान न करता पिकनिकला जाण्याची ’एक ही भूल’ तुम्ही करू नका. आपल्या मित्रांनाही करू देऊ नका. मतदानाचा पवित्र  हक्क बजावून लोकशाही

बळकट करा.

-नितीन देशमुख (7875035636)

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp