उरण : बातमीदार
उरण तालुक्यातील वशेणी गावात 20 फेब्रुवारी 2022 रोजी कुसुम गावंड यांच्या घराला आग लागून सर्व सामान आगीत भस्मसात झाले. त्यामुळे कुसुम गावंड यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीकोणातून आमदार महेश बालदी हे प्रयत्न करीत आहेत. आमदार महेश बालदी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी संपर्क साधला आहे व सर्व हकीगत त्यांना सांगितली. लगेचच प्रवीण दरेकर यांनी कुसुम गावंड यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कळवावा, असा पत्रव्यवहार तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना केला आहे. त्यामुळे गावंड कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावंड कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार महेश बालदी हे प्रयत्नशील असून भाजप उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड हेदेखील गावंड कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.