Breaking News

12 आमदारांच्या अन्यायी निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागणार; आमदार अ‍ॅड. आशिष शेलारांकडून पुनरूच्चार

मुंबई ः प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने षड्यंत्र रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा पुनरूच्चार भाजपकडून आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या 12  आमदारांची बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या वेळी कायदेविषयक कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून, या निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना आमदार अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, दोन दिवसांच्या अधिवेशनात आम्हा 12 आमदारांचे झालेले निलंबन हे एक षड्यंत्र असून सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. या निलंबनाच्या कारवाईदरम्यान पडद्यामागे जे घडले त्यातील अनेक धक्कादायक माहिती आता आमच्यापर्यंत येत आहे. ती योग्य वेळी आम्ही उघड करू. योग्य वेळी त्याचा गौप्यस्फोट करू. सूडबुद्धीने केलेल्या कारवाईत ज्यांना निलंबित करण्यात आले ते आमदार घटनेत नव्हते. कारण तशी घटनाच घडली नाही. हे एक राजकीय षड्यंत्र असून यासाठी 12 नावेच का निवडण्यात आली? ही 12 नावे का ठरवण्यात आली? हीच 12 नावे का घेण्यात आली? त्यासाठी एका वर्षाचा कालावधीच का निश्चित करण्यात आला? कुणाचा दोष नसताना, कोणीही शिवीगाळ केलेली नसतानाही कारवाई का करण्यात आली? या सगळ्यात राजकीय षड्यंत्र आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिवीगाळ केली. त्यांनीच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही सभागृहात हे मान्य केले. मग शिवसेनेच्या आमदारांना का निलंबित करण्यात आले नाही? कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करता शिक्षा घेणारे आम्ही 12 विधानसभा सदस्य असून नैसर्गिक न्यायाला धरून आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. कपोलकल्पीत घटनेवर एवढी मोठी शिक्षा देण्यात आली आहे. म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला असून आम्ही यातील सत्य न्यायालयासमोर मांडू व आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला. या वेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, मुंबईचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर, आमदार योगश सागर, पराग अळवणी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दरम्यान, अशी शिवगाळ, अशी घटना घडली नाही तरीही तुम्हाला तसे वाटत असेल तर मी पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून क्षमा मागेन, असे मी जे विधान केले तसेच माझी आणि भास्कर जाधव यांची गळाभेट झाली हे त्यांनी मान्य केले, पण गळाभेट झाल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी गळा कापला याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असा टोलाही अ‍ॅड. शेलार यांनी लगावला. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ज्या पक्षाची ओळखच शिवराळ आणि शिवीगाळ अशी आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सुनावले.

गणेशोत्सवासाठी शिवसेनेच्या गुप्त बैठका

47 वर्षे असलेली बंदी उठवून दारू परवाने वाटप करताय आणि 125 वर्षांहून जुन्या गणेशोत्सवावर बंदी का घालताय? याबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्याऐवजी सेना भवनात शिवसेनेकडून चोरी चोरी छुपके छुपके बैठका का घेतल्या जात आहेत, असा सवाल अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव समन्वय समिती, महासंघ यांना विश्वासात न घेता उत्सवाची नियमावली एकतर्फी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड संताप आणि संभ्रम पसरला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply