दुबई : वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला 2-1 अशी हार पत्करावी लागली, मात्र या सामन्यात आपली चमक दाखवणार्या फिरकीपटू कुलदीप यादवला त्याच्या कामगिरीचे फळ मिळाले. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी- 20 क्रमवारीनुसार कुलदीप यादवला एका स्थानाची बढती मिळाली असून, तो दुसर्या स्थानी विराजमान झाला आहे.
याशिवाय अष्टपैलू फिरकीपटू कृणाल पांड्याला क्रमवारीत 39 गुणांची बढती मिळाली असून, तो कारकिर्दीतील सर्वोत्तम 58व्या स्थानी पोहचलाय; तर फलंदाजीत रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे. रोहित आपल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर 10व्या स्थानावरून 3 स्थाने वर सरकून 7व्या स्थानी पोहचला आहे. धवनदेखील 1 स्थान वर सरकून 11व्या स्थानी आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पराभवामुळे भारताचे 2 गुण कमी झाले असून, सध्या भारत 124 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper