राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आवाहन; शेखर भडसावळे यांचा कृषीरत्न पुरस्कार प्रदान
पुणे, कर्जत : बातमीदार
भारत हा कृषी प्रधान देश असून देशाचा विकास हा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकर्यांना समृध्द आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, बागकाम, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया, कृषी निर्यात, जल संरक्षणासह कृषी क्षेत्रात आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला आदर्श राज्य बनविण्याचे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी (14 फेब्रुवारी) केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे कृषी व फलोत्पादन विभागाच्यावतीने सन 2015 व 2016 मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकरी व अधिकारी यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दीष्ट असून त्यादृष्टीने सरकारने काही पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.
मातीची सेवा करणार्यांचा सन्मान होत असल्याचा विशेष आनंद आहे, असे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन 2015 व 2016 मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणार्या राज्यातील 112 शेतकरी व अधिकार्यांचा गौरव करण्यात आला.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषि व फलोत्पादन विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध विभागांचे अधिकारी तसेच सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राधील कामगार, भडसावळे कुटुंबीय आणि शेतकरी उपस्थित होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper